बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचं प्रकरण सध्या चर्चेत आहे. या मुद्द्यावरून कर्नाटक सरकारविरोधात तीव्र भावना असून अस कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्रभरातून होत आहे. या पार्श्वभूमीवर या घटनेचे पडसाद महाराष्ट्र विधिमंडळाच्या सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात देखील उमटल्याचं पाहायला मिळालं. राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत यासंदर्भात निवेदन देताना कर्नाटक सरकारला तीव्र शब्दांत निषेध केला. तसेच, सीमाभागात मराठी बांधवांवर होणाऱ्या अत्याचारांवर देखील त्यांनी संताप व्यक्त केला. सीमाभागात दडपशाहीचा वरवंटा यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी कर्नाटक सरकारच्या दडपशाहीवर संताप व्यक्त केला. "राज्यघटनेनं निषेध नोंदवण्याचा अधिकार सगळ्यांना दिला आहे. पण कर्नाटक सरकारने सीमाभागातील आपल्या मराठी बांधवांचा हक्क अमान्य करून दडपशाहीचा वरवंटा फिरवण्याचं काम कर्नाटक सरकार करत आहे. तरी एवढे हाल भोगून त्यांच्या दडपशाहीला मराठी जनता भीक घालत नाही. त्यामुळे महाराष्ट्र सरकार आणि राज्यातली १२ कोटी जनता सीमाभागातील आपल्या मराठी बांधवांच्या पाठिशी भक्कमपणे उभी आहे", असं एकनाथ शिंदे म्हणाले. "कर्नाटक सरकार मराठी भाषिक जनतेवर वारंवार अन्याय करणाऱ्या घटना अनेकदा घडल्या आहेत. स्थानिक मराठी जनतेची मुस्कटदाबी करणं, मराठी पाट्या हटवणं, मराठी शाळा बंद करणं, कन्नड भाषेची सक्ती करणं असे अनेक प्रकार कर्नाटक राज्यात वारंवार घडत आहेत. त्या त्या वेळी आपली मराठी भाषिक जनता आंदोलन करते", असं देखील शिंदे म्हणाले. Maharashtra Assembly Winter Session : “भास्कर जाधव, हे बरं नव्हं”, देवेंद्र फडणवीसांचा टोला! एकनाथ शिंदेंनी सभागृहातच दिला इशारा! दरम्यान, यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी या मुद्द्यावरून कर्नाटक सरकारला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. "मी स्पष्टपणे बोलू शकत नाही. पण नाक दाबलं की तोंड उघडतं असं आपण म्हणतो. असं देखील वेळ आली तर करावं लागेल आणि त्याची सर्व जबाबदारी कर्नाटक सरकारची असेल. ते सर्व आपल्याकडे आशेनं पाहात आहेत", असं एकनाथ शिंदे म्हणाले. “मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो”, सत्ताधारी आमदारानंच दिला विधानसभेत नारा; अजित पवार लगेच म्हणाले…! अशा घटना जाणीवपूर्वक? एकनाथ शिंदे यांनी यावेळी अशा घटना जाणीवपूर्वक होतायत का? असा संशय देखील व्यक्त केला आहे. "शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना कुणी क्षुल्लक घटना म्हणून घेत असेल, तर हे दुर्दैवी आहे. त्या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध झाला आहे. अशा प्रकारच्या घटना जाणीवपूर्वक होतायत का? समाजकंटकांना पाठिशी घालण्याचं काम होतंय का, हे पाहावं लागेल", असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.