“ज्याला तोंडाची भाषा कळते त्याला ती भाषा आणि ज्याला हाताची भाषा कळते त्याला हाताची भाषा दाखवावीच लागते. कर्मचाऱ्यांना न्याय बाजारात मिळत नाही, तर तो मनगटाच्या जोरावर मिळवावा लागतो. त्यामुळे लढा उभा करताना, साम, दाम, दंड आणि भेद या नीतीचा वापर करावाच लागेल,” असं शिवसेनेचे मत माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी व्यक्त केलं. सांगलीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सहकारी बँक कर्मचाऱ्यांच्या मेळाव्याच उद्घाटन माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या हस्ते झाले. यावेळी अडसूळ बोलत होते.

आनंदराव अडसूळ म्हणाले, “राजकारणात विरोधाला विरोध नको. तत्वाने विरोध केला जावा. राजकारण शुद्ध हवे. चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हटलंच पाहिजे. कुठं गेला सांगली आणि सातारा जिल्हा? सांगली जिल्हा तर मनगटशाहीचा आणि ताकदवान जिल्हा आहे. मात्र, तरीही इथले कर्मचारी शांत कसे? कर्मचारी चळवळ कोणत्याही स्थिती थंड आणि शांत ठेवू देऊ नका.”

हेही वाचा : राज्यसभा निवडणूक : सहाव्या जागेवरून शिवसेना-राष्ट्रवादीच्या कोंडीचा कॉंग्रेसचा डाव

“विनाकारण कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकण्याचा अधिकार कोणाला नाही”

“नोकरी देण्याचा अधिकार आहे, मात्र विनाकारण कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकण्याचा अधिकार कोणाला नाही. स्वाभिमान विसरलेला आणि दबावाखाली असलेल्या बँक कर्मचाऱ्यांनी प्रथम त्यांच्यातील स्वाभिमान जागृत करावा, मग ते त्यांच्या हक्कासाठी नक्की लढतील,” असंही मत आनंदराव अडसूळ यांनी व्यक्त केलं.