विदर्भात भाजपच्या लाटेपुढे शिवसेनेचाही निभाव लागला नव्हता. तरीही अमरावती, अकोला आणि बुलढाणा या पश्चिम विदर्भात शिवसेनेची ताकद पुन्हा एकदा वाढविण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोर लावला असून, त्याचाच भाग म्हणून शिवसंपर्क मोहिमेत ते स्वत: सहभागी झाले होते. मात्र पश्चिम विदर्भात गतवैभव प्राप्त करण्याकरिता अंतर्गत कलह आणि गटबाजीवर मात करण्याचे मोठे आव्हान शिवसेनेसमोर आहे.
राज्याच्या सत्तेत भागीदार असलेल्या, पण त्याच वेळी विरोधकांची भूमिका पार पाडणाऱ्या शिवसेनेने थेट शेतकऱ्यांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यातील अस्थिर राजकीय वातावरण बघता मध्यावधी निवडणुकीची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांसोबतच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या संघटनात्मक बळकटीकरणावरही विशेष भर दिला आहे. भाजपचा गड समजल्या जाणाऱ्या पश्चिम विदर्भात शिवसेनेने शिवसंपर्क अभियान राबवून संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.
शेतकऱ्यांची कर्जमुक्ती तसेच तूर खरेदीच्या विषयावरून शिवसेनेने भाजपला लक्ष्य केले आहे. ‘आम्ही सत्तेत असलो तरी, ते सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठीच’, असे उद्धव ठाकरे यांचा दावा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिवसेनेने पुन्हा एकदा कंबर कसून आंदोलन सुरू केले आहे. शेतकऱ्यांच्या मुद्दय़ावर हे अभियान सुरू करण्यात आले असले तरी, मध्यावधीच्या शक्यतेच्या पाश्र्वभूमीवर संघटन मजबूत करणे हा मुख्य मुद्दा शिवसेनेच्या अजेंडय़ावर आहे. त्यामुळे राज्यातील तळागाळातील शेतकऱ्यांसोबत संवाद साधत पक्षाची बांधणी करण्यासाठी शिवसेनेचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी भर उन्हात कामाला लागले आहेत. या अभियानाचे विशेष म्हणजे स्वत: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा उंबरठा ओलांडून शेतकरी व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. शिवसंपर्क अभियानाला मराठवाडय़ात सुरुवात झाल्यानंतर पश्चिम विदर्भातील अकोला, बुलढाणा व अमरावती जिल्ह्य़ासाठी अकोल्यात हे अभियान घेण्यात आले.
पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी पश्चिम विदर्भात शिवसेनेला चांगलाच संघर्ष करावा लागणार आहे. अकोल्यात भाजपने शिवसेनेसोबत काडीमोड घेत स्वबळावर लढण्यासाठी तयारी सुरू केली आहे. अकोला जिल्ह्य़ात भाजपचे मंत्री, खासदार, चार आमदार आणि सर्वाधिक नगरपालिका ताब्यात आहेत. महापालिकेत भाजपने स्पष्ट बहुमतात सत्ता काबीज केली. अकोला जिल्ह्य़ात पुन्हा सक्षमपणे पाय रोवणे शिवसेनेसाठी आव्हानात्मक असले तरी भाजपमधील गटबाजी आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची निष्क्रियता शिवसेनेच्या पथ्यावर पडू शकते. त्यामुळे शिवसंपर्क अभियानातून शिवसेनेला नवी उभारी देण्याचे कार्य पक्षनेतृत्वाने केले आहे. बुलढाणा शिवसेनेतही दुफळी निर्माण झाली आहे. नियुक्त्यांवरून पक्षांतर्गत धुसफुस सुरू असून, गटबाजी शिगेला पोहोचली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर भाजप-शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना आपल्या पुत्राचा जिल्हा परिषद निवडणुकीत झालेला पराभव चांगलाच जिव्हारी लागला. जिल्ह्य़ात घाटाखाली सेनेचा एकही आमदार नाही. घाटावर सेनेचे दोन आमदार आहेत. जिल्ह्य़ात भाजपने तळागाळात पाय रोवल्याने आता शिवसेनेपुढे नव्याने मोच्रेबांधणीचे आव्हान आहे. वाशिममध्ये शिवसेनेची घसरगुंडी सुरूच आहे. थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक झाल्याने सेनेला वाशिमचे नगराध्यक्ष पद प्राप्त करता आले. विधानसभेमध्ये शिवसेना उमेदवारांना दखलपात्र लढत देता आली नाही. आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेला तयारीची गरज राहणार आहे. अमरावतीतही सेनेचे हेच चित्र कायम आहे. आनंदराव अडसूळ यांनी सलग दुसऱ्यांदा अमरावती मतदारसंघातून लोकसभा गाठली असली तरी पक्षाच्या मजबुतीकडे दुर्लक्ष झाले आहे. विधानसभेत सेनेची निराशाजनक कामगिरी राहिली. काँग्रेसला सत्तेचे गणित जुळवून आणण्यासाठी सेनेला जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष पद द्यावे लागले. पश्चिम विदर्भात सेनेला भक्कम पायाभरणी करण्यासाठी व्यापक फेरबदल करण्याची गरज आहे. त्या दृष्टीने उद्धव ठाकरे यांनी संकेत दिले आहेत. भाजपला टक्कर देण्यासाठी विदर्भात सेनेला सक्षम होणे अत्यावश्यक राहणार आहे. शिवसंपर्कच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी यांनी त्याची सुरुवात केली असली तरी, त्याला कितपत यश मिळेल हे येणारा काळच स्पष्ट करू शकेल.
ठाकरे यांच्या भेटीतच वाद चव्हाटय़ावर
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समक्ष बुलढाणा शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाटय़ावर आला. उद्धव ठाकरे बुलढाण्याचा आढावा घेत असताना पक्षातील आजी-माजी लोकप्रतिनिधींमध्ये वादावादी झाल्याचा प्रकार घडला. त्यामुळे २० तारखेला मातोश्रीवर हजेरी लावण्याचे आदेश पक्षप्रमुखांनी स्थानिक नेत्यांना दिले आहेत. या वेळी खासदार आनंदराव अडसूळ यांनाही उपस्थित राहण्याचे सांगण्यात आले आहे.