शिवसेना आणि शिंदे गटासाठी अत्यंत चुरशीची बनलेल्या दसरा मेळव्याबाबतील याचिकेवर मुंबईत उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी उच्च न्यायालयाने शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची याचिका फेटाळून लावली. तर, शिवसेनेला दादरच्या शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. या सर्व प्रकरणावरती आता माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया देत शिंदे गट, महापालिका आयुक्त यांच्यावर निशाणा साधला आहे. त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

“हिंदुस्थानात सच्चाई परेशान हो सकती हे लेकिन हार नही सकती. त्यामुळे ‘सत्यमेव जयते’ या वाक्याचे किती महत्व हे या निर्णयाने कळलं. गेली एक महिना शिवसैनिक, नागरिक धास्तावले होते. दसरा मेळाव्याची परंपरा, संस्कार मोडीत काढण्यासाठी अर्ज करण्यात आले होते. त्या अर्ज करणाऱ्यांना मोडीत काढल्याशिवाय जनता राहणार नाही,” असा इशारा किशोरी पेडणेकर यांनी शिंदे गटाला दिला आहे.

हेही वाचा – शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचा आवाज घुमणार, अरविंद सावंत म्हणाले; “बाळासाहेब ठाकरेंच्या…”

पालिकेने कायदा सुव्यस्थेचे कारण देत शिवसेनेला परवानगी नाकारली होती. त्यावर न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. “कोणत्याही आयुक्तांनी दबावाखाली येऊन काम करु नये. आपण एक सनदी अधिकारी आहात. आपल्याला एवढ्या सुविधा मिळातात, त्या कोणत्या पक्षाच्या धुरा वाहण्यासाठी नाही. आयुक्त निर्णय देण्यास टाळाटाळ करत होते. शेवटी त्यांनी हा निर्णय विधी खात्याकडे पाठवला. त्यामुळे आम्ही उच्च न्यायालयाचे दार ठोठावले,” असं किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, उच्च न्यायालयाचा निकालानंतर किशोर पेडणेकर यांनी शिवाजी पार्कवर जात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींचं दर्शन घेतलं आहे. त्या ट्विट करत म्हणाल्या की, “बाळासाहेबांचे विचार जिंकले, उद्धव साहेबांचा निर्धार जिंकला, शिवसेनेची परंपरा जिंकली, दसरा मेळावा शिवतीर्थावरच,” असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.