शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. विधान परिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे आमदार नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे आता मंत्री एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांसह सूरत गाठल्याने शिवसेना विधिमंडळ पक्षात फूट पडणार का, अशी चर्चा सुरू झाली. यानंतर प्रस्ताव आल्यास सरकार स्थापन करु असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे.

“आम्ही राजकीय पक्ष आहोत भजनमंडळी नाही. आमचं काम राजकारणाच्या माध्यमातून सत्तेवर येणे, लोकांची सेवा करणे आहे. सत्तेसाठी प्रस्ताव आल्यावर कोण नाही बोलणार,” असे सूचक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

“संजय राऊतांच्या महान नेतेगिरीमुळेच शिवसेना अडचणीत आली आहे. त्यावर ते सामनामध्ये अग्रलेख लिहीतील की तुम्हाला का आमची चिंता करण्याची गरज नाही. पण एकत्र काम केल्याने आम्हाला शिवसेनेबद्दल प्रेम आहे. त्यामुळे आमचे म्हणणे आहे की संजय राऊत शिवसेनेचे भयंकर नुकसान करत आहेत. ते काम त्यांना कोणी तरी दिले आहे,” असे चंद्रकांत पाटील यांनी एबीपी माझासोबत बोलताना म्हटले आहे.

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. “विधान परिषदेच्या निकालानंतर काही आमदारांचा संपर्क होत नाहीये हे सत्य आहे. काही आमदार मुंबईत नाहीत. पण आज सकाळपासून काही आमदारांचा संपर्क झालेला आहे. काही आमदारांना गैरसमजातून त्यांना बाहेर नेण्यात आले आहेत. एकनाथ शिंदे बाहेर असून त्यांच्यासोबत संपर्क झालेला आहे. जे चित्र निर्माण केले जात आहे त्यामध्ये शिवसेनेला कोणतेही तथ्य वाटत नाही. काही ठिकाणी संशयास्पद वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्र्यासोबत यासंदर्भात बैठक आहे,” असे संजय राऊत म्हणाले.