आम्ही आजही हिंदुत्त्ववादीच आहोत, धर्मांतर केलेलं नाही. असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला. २०१४ ला ज्या पक्षासोबत युती तोडली होती त्यानंतरही आम्ही हिंदूच होतो. हिंदुत्त्वाचा बुरखा पांघरुन वावरणारी जी मंडळी आहेत त्यांना आम्ही सोडणार नाही असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आपलीच सत्ता राज्यावर आहे हा विश्वास निर्माण करायचा आहे. आपल्याला आधीच्या सरकारसारखं वागायचं नाही. कितीही मोठं झालं तरीही आपण नम्र राहिलं पाहिजे. शिवसेना काय आहे ते सगळ्या देशाला ठाऊक आहे, आम्ही कोणताही बुरखा पांघरलेला नाही असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. नागपूरमध्ये झालेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

“आज वीर सावरकर यांच्या मुद्द्यावरुन भाजपाने गोंधळ घातला. शिवसेनेचं सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार? असा प्रश्नही त्यांनी विचारला. तुम्ही आम्हाला आमच्या वचनांची आठवण करुन देत आहात त्याची काहीही गरज नाही आमचा काही स्मृतीभ्रंश झालेला नाही” असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं आहे. एवढंच नाही तर “कुठे आहेत अच्छे दिन हे विचारल्यावर तुमची बोबडी का वळते?” असाही प्रश्न त्यांनी विचारला.

“मुख्यमंत्री झाल्यानंतर माझ्या शिवसैनिकांना भेटायला आलो आहे. मी आज कुटुंबप्रमुख म्हणून भेटायला आलो आहे. जे शिवधनुष्य हाती घेतलं आहे ते तुमच्या सगळ्यांच्या साथीने पेललं आहे. आव्हान मोठं आहे, मात्र छोटी आव्हानं आपण स्वीकारत नसतो असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. नागपूरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते. ध्यानीमनी नव्हतं तरीही मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न पूर्ण झालं. तुमचा कुटुंबप्रमुख राज्याचा मुख्यमंत्री आहे याचा अभिमान वाटतो असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

“सत्ता आल्यानंतर मी बदललो नाही, बदलणार नाही. शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत आणि कायमच राहतील. सत्ता येईल हे स्वप्न वाटत होतं. ते पूर्ण झालं आहे, सत्ता आल्यानंतर उतू नका मातू नका ही बाळासाहेब ठाकरेंची शिकवण होती ती मी विसरलो नाही” असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.