कर्नाटक सरकारच्या दडपशाहीविरोधात बेळगावातील मराठी जनतेकडून काढण्यात येणाऱ्या मोर्चात सहभागी होण्यास शिवसेना नेते दिवाकर रावते यांना परवानगी नाकारण्यात आली आहे. दिवाकर रावते या मोर्चात सहभागी होण्यासाठी कोल्हापूरहून बेळगावच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र, कागलमधील कोगनोळी फाट्याजवळ कर्नाटक पोलिसांकडून रावते यांच्या गाड्यांचा ताफा अडवण्यात आला. पोलिसांनी दिवाकर रावते आणि जिल्हाध्यक्ष संजय पवार यांना बेळगावमध्ये दाखल होण्यास परवानगी नाकारली. यावेळी पोलिसांकडून दिवाकर रावते आणि संजय पवार यांना कन्नड भाषेतील जिल्हाबंदीच्या नोटीस देण्यात आल्या. मात्र, रावते यांनी मराठी भाषेतील नोटीस देण्याचा आग्रह धरला. जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार २४ ते २७ मेपर्यंत ही प्रवेशबंदी लागू राहणार आहे. दरम्यान, पोलिसांनी ठाम भूमिका घेतल्याने दिवाकर रावते यांना पुन्हा कोल्हापूरच्या दिशेने परतावे लागले. मी महाराष्ट्र सरकारचा प्रतिनिधी म्हणून त्याठिकाणी गेलो होतो. मात्र, कर्नाटक सरकारकडून मला प्रवेश नाकारण्यात आला. मी केवळ शिवसेनेचाच प्रतिनिधी असतो तर ही बंदी नक्कीच झुगारली असती, असे रावते यांनी म्हटले.

दरम्यान, आज दुपारी १२ वाजता बेळगावातील संभाजी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. काही वेळापूर्वीच या मोर्चाची सुरुवात झाली आहे. या मोर्चात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांसह बेळगावातील मराठी जनता सहभागी झाली आहे. या पार्श्वभूमीवर याठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

‘जय महाराष्ट्र’ म्हटले तर सदस्यत्व रद्द

काही दिवसांपूर्वी कर्नाटकचे नगरविकासमंत्री रोशन बेग यांनी कुणाही लोकप्रतिनिधीने ‘जय महाराष्ट्र’ म्हटल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द करणारा नवीन कायदा आणण्याचे संकेत दिले होते. बेग यांच्या वक्तव्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सीमाभागात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. कर्नाटक सरकार आगामी अधिवेशनात कोणत्याही निर्वाचित लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक कार्यक्रमात, सभागृहात ‘जय महाराष्ट्र’ असे म्हटल्यास त्याचे सदस्यत्व आपोआप रद्द होण्याच्या दृष्टीने कायदा अमलात आणणार आहेत. बेळगाव दौऱ्यावर आलेल्या रोशन बेग यांनी अशी माहिती पत्रकारांना दिली होती. अन्य राज्यांचा जयजयकार करणाऱ्या नगरसेवकांना यामुळे चाप बसणार असल्याचा उल्लेख करून ते म्हणाले, विधिमंडळाच्या पुढील अधिवेशनात यासंदर्भातील दुरुस्ती विधेयक मांडले जाणार आहे.

सीमाभागात कर्नाटकची दडपशाही सुरूच