अनंत चतुर्दशीला प्रभादेवी परिसरात शिवसेना आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांत हाणामारी झाली. या प्रकारानंतर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी दादर पोलीस ठाण्यात पोलिसांसमोरच गोळीबार केल्याचा आरोप शिवसेना नेते सुनील शिंदे यांनी केला. या आरोपानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सदा सरवणकर यांची भेट घेतली. तसेच, या भेटीनंतर अशा प्रकारचे हल्ले करू नका. शेवटी तुम्हाला मुंबई आणि महाराष्ट्रातच राहायचे आहे, असा इशाराही राणे यांनी ठाकरे गटाला दिला. त्यावरून आता विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राणेंना चोख शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.

“शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. त्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल असून, ते गुन्हेगार आहेत. सरवणकर यांना एक मित्र म्हणून केंद्रातील मंत्री नारायण राणे भेट घेतात. त्यानंतर तुम्हाला मुंबईत, महाराष्ट्रात राहायचं आहे, अशी धमकीची भाषा करतात,” असा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे.

“मुंबई, महाराष्ट्र भाजपा, नारायण राणेंना आंदण दिलं आहे का?” असा सवाल उपस्थित करत दानवे म्हणाले की, “केंद्रातील मंत्री अशा प्रकारची दादागिरीची भाषा करतात. हे शिंदे-फडणवीसांचं सरकार गुंडांचं आहे. हे सरकार बरखास्त केलं पाहिजे,” अशी मागणीही अंबादास दानवे यांनी केली आहे.