रत्नागिरीतील दापोलीमध्ये शिंदे गटाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यावरून रामदास कदम यांच्यावर शिवसेनेच्या नेत्यांनी टीकेची राळ उडवली आहे. त्यात माजी महापौर, शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी रामदास कदम भाई म्हणायच्या लायकीचे नाही, अशी टीका करत समाचार घेतला आहे. त्या मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

“रामदास कदम पातळी सोडून बोलत असल्याचं सगळ्यांना कळत आहे. नारायण राणेंच्या आधी रामदास कदम पक्ष फोडणार होते. मात्र, तरीही बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरेंनी रामदास कदम त्यांच्या मुलाला आमदार केलं. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे ऐकत नसतील, तर रश्मी ठाकरेंकडे जात मस्का मारायचे. राज्यपालांच्या यादीत १२ आमदारांमध्ये आमदारकी मिळावी म्हणून लाळ घोटणारा हा नेता आहे. बरं झालं घाण गेली, त्या घाणीने दाखवले घाण घाण असते,” अशा शब्दांत पेडणेकर यांनी रामदास कदमांवर निशाणा साधला.

हेही वाचा – “बाळासाहेब म्हणत असतील, मी काय गद्दारांना…”; अरविंद सावतांनी घेतला रामदास कदमांचा समाचार

“तुमच्या बापाचं नाव तुमच्या आईला…”

“कोकणात गेलो, तर आम्ही भाईकडे जायचो, पण हे भयानक निघाले. यांच्यातील राक्षसी वृत्ती काय संपत नाही. तुम्हाला ऐवढे वाटत होते, तर तुमच्या मुलाला आमदार का केलं. एखाद्या शिवसैनिकाला का आमदार बनवलं नाही. तुमच्या बापाचं नाव तुमच्या आईला विचारायला जायचं का?,” असा सवालही पेडणेकर यांनी रामदास कदमांना विचारला आहे.

“12 तोंडातालं १३ वं तोंड”

फॉक्सकॉन प्रकल्पाला कोणी खंडणी मागितली होती का? याची चौकशी करण्याची मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. त्यालाही किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “५० खोके ज्यांनी घेतले, त्याची पहिली चौकशी करा. त्याच्यावर बोलण्याची हिंमत दाखवा. नको त्या गोष्टीला पुष्टी जोडून भ्रम निर्माण करणाऱ्या १२ तोंडातील हे १३ वे तोंड आहे,” असा टोला किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.