दोन पक्ष फिरून आलेल्यांनी ज्ञान पाजळू नये, अशी टीका शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांच्यावर केली आहे. आदित्य ठाकरे यांच्या पुन्हा निवडून येण्याच्या वक्तव्यावर केसरकरांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यावर पेडणेकर यांनी केसरकरांना प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले होते दिपक केसरकर?
”आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असल्याने मी जास्त काही बोलणार नाही. मात्र, आदित्य ठाकरे आम्हाला राजीनामे देऊन निवडून येण्याचे आव्हान दिले होते. मला त्यांना एवढेच सांगायचे आहे की, जेंव्हा भापजासोबत युती तुटली, तेव्हा तुम्ही राजीनामे देऊन महाविकास आघाडीच्या नावे निवडून नाही आलात. त्यावेळी तुम्ही राजीनामे देऊन महाविकास आघाडी तयार करून मग जनतेपुढे जायला पाहिजे होते. मात्र, तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बाळासाहेबांचा हिंदुत्त्वाचा विचार घेऊन निवडून आलात”, अशी प्रतिक्रिया दिपक केसरकर यांनी दिली होती.
हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पाचवा दिल्ली दौरा, आज सायंकाळी होणार रवाना
किशोरी पेडणेकरांचे प्रत्युत्तर
दिपक केसरकरांच्या या प्रतिक्रियेला शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रत्त्युतर दिले. ”केसरकरांची पत्रकार परिषद बघायची आवश्यता नाही. हाच त्यांना अपमान राहील. खरं तर दिपक केसरकर हे शिवसेनेत २०१४ साली आले. त्यामुळे ते ज्ञान पाजळत असतील, तर शिवसैनिक हे कधीही मान्य करणार नाही. उगाच सुपारी मिळाली म्हणून पीट पीट करू नये”, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.