शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. शिंदेंना सेनेच्या ३५ पेक्षा जास्त आमदारांनी पाठिंबा दिल्यामुळे शिवसेना नेमकी कोणाची हा प्रश्न विचारला जात आहे. शिवसेना आणि अपक्ष असे मिळून ४० पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा शिंदेंना असल्यामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. शिंदे समर्थक आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाताना दिसत आहे. आता कृषिमंत्री दादाजी भुसेसुद्धा एकनाथ शिंदेंच्या गटात सामील झाले आहेत. यावरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करत दादाजी भुसे यांना टोला लगावला आहे.

मुख्यमंत्र्यांना लक्ष घालण्याची मागणी

राज्याचे कृषीमंत्री दरवर्षी खरीप हंगामात राज्यातील पेरणीचा आढावा घेत असतात. यावर्षी कमी पावसामुळे पेरण्या लांबल्या आहेत. मात्र, कृषिमंत्री आसाममध्ये चिंतन शिबिरात जाऊन बसल्यामुळे शेतकरी वाऱ्यावर आहे. कृपया मुख्यमंत्री आपण लक्ष द्या, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. राऊत यांनी हे ट्विट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना टॅग केले आहे.

शिवसेनेकडून बंडखोर आमदारांना नोटीस

शिवसेना नेते एकनाथ शिंदेंसोबत बंड करणाऱ्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्षांकडे केली आहे. ४८ तासांच्या आता या आमदरांना आपले भूमिका मांडण्यास सांगितले आहे. जर आमदारांनी या वेळेत आपली भूमिका मांडली नाही, तर त्यांना अपात्र ठरवण्यात येईल, असा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला आहे.