भाजपाचे कर्नाटकातील नेते अनंत कुमार हेगडे यांनी केलेल्या एका विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सोमवारी खळबळ उडाली. “केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या ४० हजार कोटी रुपयांच्या निधीचा गैरवापर होऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस हे चार दिवसांसाठी मुख्यमंत्री झाले होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी हा निधी परत केंद्राकडे पाठवला,” असं हेगडे म्हणाले होते. त्यांच्या विधानावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी ही महाराष्ट्राशी गद्दारी असल्याचं सांगत संताप व्यक्त केला आहे.

भाजपाचे नेते अनंत कुमार हेगडे यांनी कर्नाटकात एका कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्रातील राजकीय नाट्यावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस हे चार दिवसांचे मुख्यमंत्री का झाले यामागील कारण सांगत खळबळजनक दावा केला आहे. “केंद्र सरकारचा ४०,००० कोटी रुपयांचा विकासनिधी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडे पडून होता. दरम्यान, फडणवीस यांना माहिती होते की जर शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचे सरकार सत्तेत आले, तर ते या विकासनिधीचा गैरवापर करतील. त्यामुळेच हा निधी परत केंद्राकडे पाठवण्यासाठी फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्याचं नाटक करण्याचं ठरलं. त्यानुसार, फडणवीस हे मुख्यमंत्री बनले आणि त्यानंतर १५ तासांत त्यांनी ४०,००० कोटी रुपये पुन्हा केंद्राकडे पाठवून दिले,” असा दावा त्यांनी केला.

“तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की आमचा माणूस महाराष्ट्रात ८० तासांसाठी मुख्यमंत्री बनला होता. त्यानंतर फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांनी हे नाटक कशासाठी केलं? बहुमत नसतानाही ते मुख्यमंत्री कसे झाले? असा प्रश्न सर्वजण विचारत आहेत. त्याचे हे उत्तर आहे, असेही हेगडे यांनी म्हटले आहे.

हेगडे यांच्या गौप्यस्फोटानंतर राजकीय प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली आहे. “महाराष्ट्राचा ४० हजार कोटींचा विकासनिधी केंद्राकडे परत पाठवण्यासाठी देवेंद्र फडणवीस ८० तासांसाठी मुख्यमंत्री झाले, भाजपाचे खासदार अनंतकुमार हेगडे सांगत आहेत. ही महाराष्ट्रासोबत गद्दारी आहे,” असं म्हणत राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.