Vinayak Raut On Devendra Fadnavis: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार अस्तित्वात आलं आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले असून उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आली आहे. भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने आदेश दिल्यानंतर फडणवीसांना उपमुख्यमंत्री पदाची सूत्रं हाती घ्यावी लागली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विशेष म्हणजे शपथविधी होण्यापूर्वी काही तास आधीपर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील, असं सर्वांना वाटत होतं. मात्र केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशामुळे महाराष्ट्रातील सत्तानाट्याला मोठी कलाटणी मिळाली आणि फडणवीसांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं. यामुळे आता राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहेत. फडणवीसांना अंधारात ठेवून हा निर्णय घेतल्याचा दावाही अनेक नेत्यांकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते विनायक राऊत यांनी फडणवीसांना खोचक टोला लगावला आहे.

ओबीसी आरक्षणासाठी महाविकास आघाडीने काय काम केलं? याबाबत विचारलं असता विनायक राऊत म्हणाले, “ओबीसी प्रवर्गाला राजकीय आरक्षण मिळालंच पाहिजे. केंद्र सरकारने जाणूनबुजून इम्पेरिकल डेटा दिला नाही. इम्पेरिकल डेटा दिला असता तर ओबीसी आरक्षण लागू झालं असतं. पण केंद्र सरकारने दुटप्पीपणा केला. संसदीय समितीपुढे एक आणि न्यायालयात वेगळी भूमिका घेतली. ओबीसी आरक्षणाचं श्रेय शिवसेना किंवा महाविकास आघाडीला मिळू नये, म्हणून केंद्राने हा डेटा दिला नाही.”

हेही वाचा- “गद्दारांना गाडून भगवा फडकवू” बंडखोर आमदारांवर विनायक राऊतांचा संताप

ओबीसी आरक्षणाबाबत पुढे बोलताना विनायक राऊत म्हणाले की, “ओबीसी आरक्षणाचं काम एकनाथ शिंदे यांच्या आकलनापलीकडचे आहे. पण देवेंद्र फडणवीसांना माझी विनंती आहे, की दिल्लीत तुमचं वजन असेल, तर ते वापरा आणि ओबीसीचा प्रश्न सोडवा. पण आता दिल्लीत तुमचं वजन कमी झालं आहे, हे दिसून आलं आहे. तुम्हाला अंधारात ठेवून सर्व निर्णय घेण्यात आले. त्यामुळे तुम्हाला घोड्यावरून उतरून गाढवावर बसावं लागलं, हे तुमचं दुर्दैवं आहे. पण देवेंद्र फडणवीस आणि आम्ही एकत्र काम केलं आहे. त्यांच्या बुद्धीचातुर्याबद्दल आणि अभ्यासाबद्दल मला खूप अभिमान आहे,” असंही ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena leader vinayak raut criticize deputy cm devendra fadnavis and central government over obc reservation rmm
First published on: 06-07-2022 at 20:39 IST