scorecardresearch

…मग मोहन भागवतांच्या नावापुढे ‘खान’ लावणार आहात का?; उद्धव ठाकरेंची भाजपाला विचारणा

एमआयएम पक्षाने आघाडीसाठी दिलेली ऑफर हा कट; उद्धव ठाकरेंचा आरोप

Shivsena, Maharashtra CM Uddhav Thackeray, MIM alliacne, Imtiyaz Zalil, Imtiyaz Jaleel, RSS Mohan Bhagwat
आरएसएसला मुस्लीम संघ की राष्ट्रीय मुस्लीम म्हणायचं का?

एमआयएम पक्षाने आघाडीसाठी दिलेली ऑफर हा कट असल्याचा आरोप राज्याचे मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानासाठी उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या सर्व खासदारांना आणि जिल्हाप्रमुखांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली. बुडाखाली सत्ता हवी असून ही एका घातक हुकूमशाहीची नांदी आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी यावेळी केली.

“सत्ता आल्यानंतर निखाऱ्यावरील जमलेल्या राखेवर फुंकर मारण्याची गरज आहे. धगधगता निखारा ही शिवसेनेची ओळख असून ती राख झटकून टाकणं, त्याची धग विरोधकांना दाखवण्याची गरज आहे,” असं आव्हान उद्धव ठाकरेंनी यावेळी केलं. एकहाती सत्ता यावर नंतर बोलू…पण पक्ष वाढवण्याची गरज आहे असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

एमआयएमने आघाडीचा प्रस्ताव दिल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

“आपण लोकसभा, विधानसभा आणि काही पालिका निवडणुका सोडल्या तर गांभीर्याने घेत नाही. पण आता तसं करुन चालणार नाही. भाजपाचं पंचायत ते संसद असं स्वप्न असून या सत्तेच्या ठिकाणी दुसरं कोणी असता कामा नये या त्यांच्या धोरणाला रोखलं पाहिजे. आपल्या बुडाखाली संपूर्ण देश असला पाहिजे या अट्टहासाने ते चालले आहेत. ही एका घातक हुकूमशाहीची नांदी आहे. हे आपलं हिंदुत्व नव्हतं,” असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. आपण राजकारणासाठी हिंदुत्वाचा वापर करत नाही हा मुख्य फरक आहे असंही ते म्हणाले.

आम्ही भाजपाला सोडलं आहे, हिंदुत्वाला नाही याचा पुनरुच्चार उद्धव ठाकरेंनी यावेळी केला. सत्ता असो किंवा नसो आम्ही हिंदुत्वाला सोडणार नाही असंही ते म्हणाले. “विरोधकांचं धोरण ओळखा. भाजपाकडे आपण काय केलं हे सांगण्यासारखं नाही, म्हणून आपल्यावर टीका करत आहेत. उत्तर प्रदेशात त्यांनी दैदीप्यमान विजय मिळवला असं काही नाही. समाजवादी पक्षाच्या जागाही वाढल्या आहेत. एक भ्रम निर्माण केला जात आहे आणि संमोहन करत आहेत. वस्तुस्थितीचा विचार करणार नाही अशा पद्धतीची दाखवायची,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘जनाब’सेना म्हणणाऱ्या फडणवीसांना संजय राऊतांनी दिलं उत्तर; म्हणाले “दहशतवाद्यांशी हातमिळवणी…”

“पूर्वी इस्लाम खतरे मे है म्हणायचे, आता हिंदू खतरे मे अशी नवीन बांग त्यांची सुरु आहे. दरवेळी अनामिक भीती दाखवायची. इतिहासाच्या खपला काढल्या जात असून हा डाव मोडून काढला पाहिजे,” असं आव्हान उद्धव ठाकरेंनी यावेळी केलं.

“शिवसेनेला जनाबसेना म्हटलं जात आहे. आपण हिंदुत्व सोडलेलं नाही. आत डाव पहा…काही कारण नसताना एमआयएमने महाविकास आघाडीला आघाडीची ऑफर दिली आहे. काही संबंध आहे का? हाच खऱा डाव आहे. एमआयएने ऑफर द्यायची आणि मग नंतर भाजपाने यावरुन टीकेचा भडीमार सुरु करायचा. औरंगजेबाच्या थडग्यावर डोकी टेकतात त्यांच्यासोबत मेलो तरी जाणार नाही इतकी कडवट निष्ठा असताना उगाच हा मुद्दा काढायचा आणि आम्ही हिंदुत्वापासून दूर चाललो आहोत हे दाखवायचं. आम्ही काय मूर्ख नाही. आम्ही भाजपासारखं सत्तेसाठी लाचार नाही. आम्ही एमआयएमसोबत जाणं शक्य नाही,” असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.

“अफजल गुरुला फाशी देऊ नको म्हणणाऱ्या मेहबुबा मुफ्तीसोबत सत्तेसाठी मांडीघाशी केली तितका निर्लज्जपणा शिवसेनेत येणं शक्य नाही. मी तो कदापि येऊ देणार नाही. सत्ता मिळत असली तरी एमआयएमसोबत जाणार नाही,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“शिवसेना मुस्लीमधार्जिणी झाल्याचं म्हणत आहेत. मी काही मोहन भागवत यांची वाक्यं घेऊन बसलो आहे. जर मला जनाब म्हणणार असाल तर तुमच्या सरसंघचालकांना काय बोलणार आहात? मोहन भागवतांच्या नावापुढे खान किंवा जनाब जोडणार आहात का? आधी हिंदुत्व काय ते समजून घ्या,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. तुमची सत्तेची स्वप्नं आम्ही चिरडून टाकली म्हणुन आम्ही मुस्लीमधार्जिणी असू तर मोहन भागवतांनी काय सांगितलं आहे ते ऐका असं सांगत उद्धव ठाकरेंनी त्यांची काही वक्तव्यं वाचून दाखवली. तसंच आरएसएसला मुस्लीम संघ की राष्ट्रीय मुस्लीम म्हणायचं का? असंही त्यांनी विचारलं.

मोहन भागवतांच्या वक्तव्यावर मोदी, अमित शाह आणि ज्यांच्या तोंडातून गटारगंगा वाहत असते ते उत्तर देऊ शकतात का? अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली. शिवसेनेने हिंदुत्व सोडलं असा भ्रम निर्माण केला जात आहे. एक दिवस कदाचित हिंदुत्वाचे बाप आम्हीच आहोत असंही म्हणायला कमी करणार नाही. हिंदू धर्म आम्हीच स्थापन केला असंही म्हणतील पण तो त्यांचा मानसिक आजार असेल. आपला तो बाब्या आणि दुसरा तो गुंड अशी त्यांची मानसिकत झाली असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली.

“दुसऱ्यांनी खाल्लं तर शेण आणि आम्ही खाल्लं तर श्रीखंड हा प्रकारही लोकांच्या नजरेत आणला पाहिजे. यांचे नुसते जबाब घेतले तर तळपायाची आग मस्तकात जाते. लगेच लोकशाहीचा खून झाल्याचा आरोप करतात,” असा संताप उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “अधिवेशनाच्या आधी भुजबळांनी त्यांच्या घऱी सर्वांना जेवायला बोलावलं होतं. त्यावेळी यावर चर्चा झाली असता भाजपात आणि आपल्यात खोटं बोलू शकत नाही हा मुख्य फरक असल्याचं मी सांगितलं. खरं बोलणं हा अवगुण ठरत आहे पण खोटं बोलून जिंकावं लागत असेल तर त्यासारखं दुर्दैव नाही. जर भाजपा अशाच पद्दतीने लढत जिंकत राहिला तर सत्यमेव जयतेच्या जागी असत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य ठेवावं लागेल”, अशी खंत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली.

“विधानसभेतील १२ आमदारांचं निलंबन करण्यात आल्यानंतर सुप्रीम कोर्टाने आम्हाला न्याय दिला असं ते म्हणत होते. पण तसं नाहीये…कोर्टाने अधिकार अमान्य केला नसून किंवा शिक्षा रद्द केली नाही तर फक्त कालावधी कमी करा असं सांगितलं. खोटं काम अजिबात झालेलं नाही. या छोट्या गोष्टी लोकांसमोर मांडणं गरजेचं आहे. काही झालं की लोकशाहीचा खून म्हणून आरडाओरड होते,” असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरेंनी हायकोर्टाने विधानपरिषद सदस्य नियुक्तीवरुन राज्यपालांवर ताशेरे ओढल्याचा संदर्भ देत हा लोकशाहीचा खून नाही का? अशी विचारणा केली.

“देशाला सात वर्षांपूर्वी स्वातंत्र्य मिळाल्याचे तारे कोणीतरी तोडले होते. पण या गेल्या सात वर्षात काय झालं ते सांगा? काहीच नाही…मग आपल्यावर आरोप करणं…दुसऱ्यांवर देशद्रोही ठरवणं, पाकधार्जिणा, दाऊदचा हस्तक ठरवणं सुरु होतं. खरं असेल तर चित्रपटाच्या माध्यमातून जी फाईल उघडली आहे तो काळ आठवा. ज्यावेळी काश्मीरमध्ये हिंदू आणि त्याआधी देशाच्या बाजूने असणाऱ्या मुस्लिमांवर अत्याचार झाला. त्यावेळी सरकार भाजपाने समर्थन दिलेल्या व्ही पी सिंग यांचं होतं. त्यांना आपण विरोध केला होता. कारण त्यांनी पंतप्रधान झाल्यावर कोणत्याही मंदिरात नाही तर दिल्लीतील जामा मशिदीत जाऊन शाही इमामला भेटून आले होते. भाजपाने एकही अवाक्षर काढलं नव्हतं. एकच आवाज तेव्हा जो होता तो बाळासाहेब ठाकरेंचा होता. पण आता अश्रू ढाळत असलेल्या एकानेही ब्र काढला नव्हता आणि हिंमतही नव्हती,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“सत्य मांडायचं असेल तर सर्वांसमोर येऊ द्या. पण पिढी बदलल्यानंतर आज आम्ही नवीन इतिहास घडवला म्हणून दंड थोपटत आहेत त्यांची नावंही काश्मिरी जनतेला माहिती नव्हती,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. अमरनाथ यात्रा रोखली तर हजसाठी एकही विमान उडू देणार नाही असं कोणीही बोललं नव्हतं. दहशतवाद्यांना अंगावर घेणारे बाळासाहेब ठाकरे एकच मर्द होते, दुसरं कोणीही नव्हतं असंही त्यांनी सांगितलं.

“भाजपाचं हिंदुत्व थोतांड आहे हे जनतेला दाखवण्याची गरज आहे. पाकधार्जिणी म्हणणार असाल तर जास्त गोष्टी कोणाच्या काळात झाल्या. वाजपेयींनीच भारत-पाकिस्तान बससेवा सुरु केली होती. त्यावेळीही यावरुन टीका झाली होती. इथपासून ते नवाज शरिफ यांच्या वाढदिवसाचा केक खाणारे मोदी…हे सर्व आम्ही पाहत आहोत. पाकिस्तानात गेल्यानंतर जिनांच्या थडग्यावर नतमस्तक कोण झालं होतं हे पाहिलं आहे. आम्ही पाकिस्तान जनता पार्टी, हिजबूल जनता पक्षही म्हणू शकतो. तुम्ही कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळणार असाल तर आम्ही कमरेचं सोडणार नाही पण तुमचं उघडं पडलेलं जनतेला दाखवून देऊ,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“हिटरलने प्रवक्त्यांच्या चार फळ्या केल्या होत्या. आपण केलेली कामं जनतेसमोर मांडणं, विरोधकांच्या आरोपांना उत्तर देणं, विरोधकांवर आरोप करणं आणि अफवा पसरवणं या चार फळ्या होत्या आणि भाजपा यावर पावलं टाकत आहे. दुसऱ्यांबद्दल द्वेष, भीती निर्माण करणं आणि आपणच तारणहार आहोत हे बिंबवणं उत्तर प्रदेशात झालं,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

एमआयएमसोबत युती होणार नाही याचा पुनरुच्चार उद्धव ठाकरेंनी यावेळी केला. झोपेतही एमआयएमसोबत युती करणार नाही. ही भाजपाकडूनच ऑफर आल्याची १०० टक्के खात्री आहे. एमआयएम भाजपाची बी टीम असल्याची खात्री झाली आहे. धोका आहे त्यांना बदनाम आणि नामशेष करणं ही त्यामागची चाल आहे असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.

औरंगजेबाच्या थडग्यावर डोकं टेकणारी जी औलाद आहे, तिच्यासोबत छत्रपतींचा महाराष्ट्र आणि त्यांचा सैनिक म्हणवणारा शिवसैनिक हा कदापि जाणार नाही आणि मी जाऊ देणार नाही असा पुनरुच्चार उद्धव ठाकरेंनी केला. यावेळी त्यांनी भाजपाचं मुस्लीमप्रेम जनतेसमोर आणण्याचं आवाहनही केलं. शिवसैनिक हिंदुत्वाचा अंगार असतो हे त्या भंगारांना दाखवून द्या असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shivsena maharashtra cm uddhav thackeray on bjp mim alliacne propose rss mohan bhagwat sgy