मुंबई: आपल्या मतदार संघातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी एका आमदारांने चक्क विधानसभा अध्यक्षांनाच आव्हान दिल्याची घटना शुक्रवारी विधानसभेत घडली. आपल्याला जी शिक्षा द्यायची ती द्या, पर्वा नाही अशी भूमिका घेत या आमदार महोदयांनी थेट अध्यक्षांच्या आसनाजवळ बैठक मारली.

विधानसभेत प्रश्नोतराचा तास संपत असतानाच आपल्याला बोलू द्या अशी आग्रही मागणी करीत शिवसेनेचे (शिंदे) नांदेड जिल्हयातील हदगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे बोलण्याची परवानगी मागितली. मात्र प्रश्नोत्तराचा तास संपल्याचे सांगत अध्यक्षांनी परवानगी नाकारत पुढील कामकाज पुकारले. त्यामुळे संतप्त झालेल्या कोहळीकर यांनी थेट अध्यक्षांच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत धाव घेत थेट मेजवर बैठक मारली.

अध्यक्ष नार्वेकर यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. नंतर कारवाईचा इशारा दिला. मात्र संतप्त कोहळीकर यांनी आपला हट्ट सोडला नाही. तु्म्हाला जी कारवाई करायची ती करा, शिक्षा द्यायची ती द्या, मला पर्वा नाही. माझ्या मतदार संघातील महत्वाचे प्रश्न आहेत, आपल्याला आधी बोलू द्या अशी मागणी त्यांनी केली, दोघांमधील वाद विकोपास जाताच जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी पुढे येत कोहळीकर यांना मेजवरुन खाली उतरविले आणि त्यांची समजूत काढत जागेवर आणून बसविले.

अध्यक्षांच्या समोरील मेजापर्यंत जाणाऱ्या सत्ताधारी आमदाराच्या विरोधात काहीच कारवाई झाली नाही याबद्दल विरोधकांनी आश्चर्य व्यक्त केले. हाच प्रकार विरोधी आमदाराने केला असता तर त्याला लगेचच निलंबित केले असते.