“शरद पवार यांनी जनतेचा विचार करून रयत संस्थेचे अध्यक्षपद सोडावे”, शिवसेनेच्या ‘या’ आमदाराची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जनतेचा विचार करून रयत संस्थेचे अध्यक्षपद सोडावे, अशी मागणी एका शिवसेनेच्या आमदाराने केली आहे.

“शरद पवार यांनी जनतेचा विचार करून रयत संस्थेचे अध्यक्षपद सोडावे”, शिवसेनेच्या ‘या’ आमदाराची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जनतेचा विचार करून रयत संस्थेचे अध्यक्षपद सोडावे, अशी मागणी कोरेगावचे शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी केली आहे. साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर भाऊराव पाटील यांनी घटना लिहिली होती. त्यामध्ये त्यात महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हा रयतचा अध्यक्ष असला पाहिजे, असं म्हटलं. मात्र, काही वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ती घटना बदलली, असा आरोप आमदार महेश शिंदे यांनी केलाय.

महेश शिंदे म्हणाले, “रयत शिक्षण संस्थेचे खासगीकरण होता कामा नये. ज्या लोकांची पात्रता नाही त्या लोकांना रयतच्या कार्यकारी मंडळ सदस्य म्हणून घेतलं जातं. याचे दुःख वाटते. रयतला देणगी दिली म्हणून मालकी दाखवणं चुकीचं आहे. आज रयतमध्ये नोकरी लावण्यासाठी खुलेपणाने पैसे मागितले जातात. बारामतीच्या एकाच व्यक्तीला रयतेचे काम दिले जात असल्याने संशयाचे वातावरण निर्माण होत आहे.”

“…तर रयत संस्थेसाठी फार मोठा धोका निर्माण होईल”

“शरद पवारांनी वंशपरंपरागतीने पुढील पिढीला रयतचे अध्यक्षपद दिलं, तर रयत संस्थेसाठी फार मोठा धोका निर्माण होईल. ज्यांना समाजातील कसलीच जाण नाही अशांना या संस्थेवर घेतले. त्यामुळे जनतेचा विचार करून शरद पवार रयतचे अध्यक्षपद सोडतील,” अशी खोचक टीका शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी केली.

“राजकीय ताकद असल्याने ही संस्था ताब्यात घेतली”

महेश शिंदे म्हणाले, “खासदार उदयनराजेंना रयत’च्या कार्यकारी मंडळावर घेतले नाही ही संपूर्ण महाराष्ट्राची खदखद आहे. राजकीय ताकद असल्याने ही संस्था ताब्यात घेण्यात आली. हे चुकीचे आहे. राजघराण्याने ही जागा रयत संस्थेच्या मुख्यालयाला दिली आहे. पात्रता नसणारे लोक रयत शिक्षण संस्थेवर गेल्याने संस्थेला धोका निर्माण झाला आहे.”

“एकाच परिवारातील ९ जण रयत संस्थेमध्ये कार्यकारिणीत आहेत. त्यांचे रयतसाठी योगदान काय?” असा सवालही आमदार महेश शिंदे यांनी उपस्थित केला.

नक्की वाचा >> शरद पवारांवर टीका करणाऱ्या शिवसेना आमदाराला शशिकांत शिंदेंनी सुनावलं; “दोन वर्षांच्या सत्तेने डोक्यात हवा आणि गर्व…”

“शरद पवारांचे रयतमधील योगदान पाहता त्यांच्याबद्दल बोलताना आपली उंची किती हे तपासा”

आमदार महेश शिंदे यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय. ते म्हणाले, “स्पर्धेच्या युगातही रयत संस्था टिकवण्याचे काम संस्थेचे अध्यक्ष म्हणून शरद पवार यांनी केले. शैक्षणिक स्पर्धेत दर्जा आणि सुविधा देण्याचे काम सरकारचे आहे. पण अनुदान असे कितीसे मिळते. त्यापेक्षा १२ ते १५ कोटी रुपयांचा निधी केवळ शरद पवार यांच्या आवाहनावरून मिळतो. संगणकापासून ते इंजिनिअरिंगपर्यंत अनेक प्रकल्प शरद पवारच अध्यक्ष झाल्यापासून या संस्थेत सुरू केले आहेत.”

हेही वाचा : “तुम्ही हर्बल वनस्पती किंवा क्रुझ पार्टीत ड्रग्ज घेऊन तर…”, मुनगंटीवारांचा शरद पवार आणि अनिल परबांवर हल्लाबोल

“शासकीय अनुदान व्यतिरिक्त निधी उभा करण्याची किमया या महाराष्ट्रात त्यांच्याच माध्यमातून झाली आहे. अनेक लोक इतर संस्थेचे अध्यक्ष आहेत, परंतु त्यांचे योगदान आणि शरद पवार यांचे रयतमधील योगदान पाहता त्यांच्याबद्दल बोलताना आपण किती बोलतो याचे भान ठेवावे. चांगल्या चाललेल्या संस्थेवर टीका करून नाहक बदनामी करू नका. अन्यथा, तुमचे स्वतःचे राजकारण संपेल,” असा इशारा शशिकांत शिंदे यांनी दिला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shivsena mla demand resignation of sharad pawar from body of rayat education society pbs

Next Story
उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही अभिनेते सयाजी शिंदे यांना पोलीसांच्या जागेत वृक्षारोपणास परवानगी नाकारली
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी