मुंबई : राज्य सरकार रस्ते बांधणीवर ४४७८ कोटी रुपये खर्च करणार आहे. त्यातील हजार एक कोटी रुपये गेली अनेक वर्षे रखडलेल्या मुंबई गोवा मार्गावर खर्च करा. सरकारच्या कोकणावर उपकार होतील, कोकणातील काजू उत्पादक रसातळाला गेला आहे. त्याला किमान आधारभूत किंमत द्या, राज्यात दहा कोटी झाडे लावण्याचे लक्ष आहे. त्याऐवजी कोकणातील जंगलतोड थांबवा, वन विभागाचे त्याकडे लक्ष नाही. वन विभागाचाच टांगा पलटी झाला आहे, अशी बोचरी टीका शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार निलेश राणे यांनी विधानसभेत केली.
राज्यपालांच्या अभिभाषणाचे सर्मथन करताना राणे यांनी सरकारवर प्रहार केले. मुंबई गोवा महामार्ग गेली अनेक वर्षे रखडला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्रयातील काम झाले आहे पण रत्नागिरी व रायगड मधील १०० किलोमीटर अंतराचे काम बाकी आहे. त्यासाठी ८०० ते १००० कोटी रुपये देऊन हा मार्ग एकदाच पूर्ण करा. कोकणावर उपकार होतील, अशी विनवणी सरकारला केली.
काजू आयातीवर शुल्क वाढवून काजू उत्पादकांना दिलासा द्या, दहा कोटी झाडे लावण्या अगोदर आहेत ती झाडे जगवा, कोकणात खूप मोठया प्रमाणात जंगलतोड होत आहे. वन विभाग नेमके काय करत आहे ते कळत नाही. जंगलतोड झाल्याने माणूस आणि जनावरामध्ये संर्घष सुरू झाला आहे.
जंगली जनावरे गावात येऊ लागली आहे. या जनावरामुळे शेती करण्यास शेतकरी तयार नाही. कोकणातील वन अधिकारी रेड्डी, अय्यर या नावाचे आहेत. त्यांना मालवणी भाषा कळत नाही. तक्रारी केल्यानंतरही वन विभाग दखल घेत नाही. त्यांचा टांगा पलटी झाला आहे. (वनमंत्री गणेश नाईक यांनी पालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांचा टांगा पलटी करेन, अशी गर्जना केली होती.
तो संदर्भ धरुन राणे यांनी नाईकांचे नाव न घेता टीका केली) अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे सुरु करा, गो हत्या थांबलेली नाही. गो हत्या करणाऱ्यांवर मोकाका लावला नाही. सिंधुदुर्गात नकली दारु तयार केली जाते. अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांनी हैदोस घातला आहे. हे सर्व करण्यासाठी काही तरी करा, अशा शब्दात राणे यांनी सरकारला घरचा आहेर दिला.

