शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाचा ऐतिहासिक दसरा मेळावा पार पडला. दोन्ही मेळाव्याला लाखो कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. या मेळाव्यात बंडखोर नेत्यांना ‘गद्दार’ म्हणत उद्धव ठाकरेंनी सडकून टीका केली. या टीकेनंतर शिंदे गटातील नेते प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “९ जून २०२१ मध्ये उद्धव ठाकरेंना पत्र लिहून काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेला कमकूवत किंबहूना संपवत असल्याचे सांगितले होते. भाजपासोबत युती करण्याची मागणी मी त्यावेळी केली होती. मात्र, या पत्राची दखल त्यांनी घेतली नाही. जवळपास एक वर्षानंतर या पत्राची दखल घेत एकनाथ शिंदेनी भाजपासोबत सत्ता स्थापन केली”, असा पलटवार प्रताप सरनाईक यांनी केला आहे.

‘नातूही नगरसेवक पदावर डोळे लावून बसलाय’, उद्धव ठाकरेंच्या टीकेने एकनाथ शिंदे व्यथित, संताप व्यक्त करत म्हणाले “ज्या दिवशी…”

भाजपासोबत सत्ता स्थापनेनंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी धडाकेबाज निर्णय घेतल्याचे सरनाईक यांनी म्हटले आहे. शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी १८०० बसेसच्या बुकिंगसाठी १० कोटी खर्च केल्याचा आरोप करण्यात येत होता. या आरोपाचा सरनाईक यांनी समाचार घेतला. “आम्ही ४० आमदार, १२ खासदार आहोत. अनेक कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत. या कार्यकर्त्यांनी जर स्वखर्चाने काही केलं असेल तर त्यात वावगं काय?” असा सवाल सरनाईक यांनी केला आहे. कुठलेही मेळावे शासकीय नसतात. शिवाजी पार्कमधील मेळावा फुकट झाला आहे का? अशी विचारणाही त्यांनी यावेळी केली.

Dasara Melava: CM शिंदेंचं ‘ते’ एक वाक्य अमृता फडणवीसांना फारच आवडलं; कौतुकाचा वर्षाव करत म्हणाल्या, “आपल्या राज्याला जो…”

दरम्यान, बीकेसीतील मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. हजारो शिवसैनिकांनी आपला घाम, रक्त सांडवून जो पक्ष उभा केला तो तुम्ही तुमच्या वैयक्तिक राजकीय फायद्यासाठी, महत्त्वकांक्षेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे गहाण टाकला, अशी टीका शिंदेनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. “बाळासाहेब ठाकरे रिमोट कंट्रोलने सरकार चालवायचे. तुम्ही तर सरकारचा आणि शिवसेनेचा रिमोट कंट्रोल राष्ट्रवादीच्या हातात गहाण टाकला. तुम्ही त्यांच्या तालावर नाचू लागला आणि आम्हालाही नाचवायला लागलात”, असा शाब्दिक हल्ला शिंदेंनी ठाकरेंवर चढवला आहे. बाळासाहेबांनी ज्या पक्षांचा ‘हरामखोर’ असा उल्लेख केला त्यांच्या दावणीला तुम्ही शिवसेना बांधली होती. हे बघून बाळासाहेबांच्या मनालाही वेदना झाल्या असतील, अशी भावना शिंदेंनी या मेळाव्यात व्यक्त केली.