Kiran Ahir Post for Father Sachin Ahir : शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे नेते सचिन अहिर यांनी पक्षांतर केल्याने गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध आरोप केले जात आहेत. या सर्व टीकेला आणि आरोपांना आता त्यांच्या कन्या किरण सचिन अहिर यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे अत्यंत भावनिक आणि थेट शब्दांत उत्तर दिलं आहे.

“माझ्या वडिलांना पक्षाने भरपूर काही दिलं, तरी त्यांनी पक्ष का बदलला? असा प्रश्न विचारणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावं की, पदे ही मेहेरबानी म्हणून मिळत नाहीत, ती कष्टाने आणि कर्तृत्वाने कमवावी लागतात”, अशा स्पष्ट शब्दांत किरण अहिर यांनी आपल्या वडिलांची बाजू मांडली आहे. किरण अहिर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे,”गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर माझ्या वडिलांबद्दल अनेक आरोप आणि द्वेषयुक्त संदेश मी पाहत आहे. आज मी येथे कोणाशीही वाद घालण्यासाठी किंवा कोणाविरुद्ध बोलण्यासाठी आलेली नाही. मी फक्त एक मुलगी म्हणून, लहानपणापासून ज्या माणसाला अत्यंत जवळून पाहिले आहे, त्या वडिलांबद्दलचा माझा दृष्टिकोन मांडत आहे.”

पदे ही मेहेरबानी नसून कर्तृत्वाची पावती

सध्या एक प्रश्न सर्वाधिक विचारला जात आहे की, ‘जर त्यांना आधीच इतके काही दिले गेले होते, तर त्यांनी पक्ष का बदलला?’ याचे उत्तर देण्यापूर्वी, राजकारणाचा खरा हेतू फक्त पद किंवा अधिकार मिळवणे नसून जनतेची सेवा करणं हा आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. अनेक जण म्हणतात की पक्षाने माझ्या वडिलांना खूप काही दिले, मी या गोष्टीचा पूर्ण आदर करते. पण यासोबतच दुसरा एक प्रश्नही विचारला गेला पाहिजे. जर माझे वडील त्या जबाबदाऱ्यांसाठी पात्र नसते, त्यांनी वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि कठोर परिश्रम केलं नसतं, तर त्यांच्यावर एवढ्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या गेल्या असत्या का?”

नातं दोन्ही बाजूंनी असतं

किरण यांनी पुढे लिहिलं की, “कोणतेही पद कोणावर मेहेरबानी म्हणून दिलं जात नाही. ते कठोर परिश्रम, क्षमता, नेतृत्व आणि काळाच्या ओघात निर्माण झालेल्या विश्वासामुळे कमावलं जातं. प्रत्येक नातं हे दोन्ही बाजूंनी असतं. ज्याप्रमाणे पक्षाने माझ्या वडिलांवर विश्वास दाखवला, त्याचप्रमाणे माझ्या वडिलांनीही सोपवलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिक सेवा, समर्पण आणि अतोनात कष्ट करून पूर्ण केली. म्हणूनच, कोणत्याही राजकीय निर्णयाचा न्यायनिवाडा करण्यापूर्वी, तो निर्णय घेणाऱ्या व्यक्तीचा संपूर्ण प्रवास समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे.”

राजकीय पक्ष फक्त माध्यम

“२०१९ मध्ये माझे वडील सचिन अहिर यांनी वरळीतील आपल्या स्वतःच्या राजकीय दाव्याचा त्याग करून आदित्य ठाकरे यांच्यासाठी पूर्ण निष्ठेनं काम केलं, हे प्रत्येकाला माहितेय. पण केवळ एखादी जबाबदारी मिळणं म्हणजेच सर्वकाही नसतं. कधीकधी एखाद्या व्यक्तीला असं जाणवतं की, काही लोककल्याणकारी उपक्रम, विकासाचे निर्णय आणि महत्त्वाचे प्रश्न ज्या पद्धतीने पुढे जावयाला हवे होते, तसे ते जात नाहीत. अशा परिस्थितीत, पहिली जबाबदारी ही असते की ते प्रश्न संघटनेत अंतर्गत पातळीवर उपस्थित करणे आणि आतून बदल घडवून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे. परंतु, प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नानंतरही जर एखाद्याला असं वाटत राहिलं की आपण आपल्या पूर्ण क्षमतेने जनतेची सेवा करू शकत नाही, तर त्याच्यासमोर एक कठीण निर्णय घेण्याची वेळ येते. त्यांनी केवळ एका पदाला चिकटून राहावं की असा मार्ग निवडावा ज्यामुळे ते अधिक प्रभावीपणे जनतेची सेवा करू शकतील? माझ्या मते, माझ्या वडिलांचा निर्णय कधीही कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नव्हता. तो एक अत्यंत कठीण राजकीय निर्णय होता, जो या विश्वासाने घेतला गेला की त्यांचे खरे कर्तव्य हे तिथेच आहे जिथून ते जनतेची जास्तीत जास्त आणि सर्वोत्तम सेवा करू शकतील. कारण सरतेशेवटी, राजकीय पक्ष हे केवळ एक माध्यम असतं. अंतिम ध्येय हे नेहमीच जनता आणि लोकसेवा हेच असायला हवं, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.

माझ्या वडिलांनी अविरत सेवा केली

“आता, मला राजकारणाबद्दल बोलायचं नाहीये. मला माझ्या वडिलांबद्दल बोलायचं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मला त्यांचा हा प्रवास अत्यंत जवळून पाहण्याचं भाग्य लाभलं आहे. त्यांच्यासाठी राजकारण म्हणजे कधीही फक्त निवडणुका जिंकणं किंवा पद मिळवणं नव्हतं. त्यांच्या दृष्टीने राजकारणाचा अर्थ नेहमीच लोकांमध्ये राहणे हाच राहिला आहे. अशा कितीतरी वेळा झाल्या असतील ज्या मी मोजूही शकत नाही, जेव्हा एखाद्या गरजू व्यक्तीचा फोन आला म्हणून ते कौटुंबिक क्षण आणि वैयक्तिक कार्यक्रम सोडून निघून गेले. मी त्यांना रात्री उशिरापर्यंत बसून लोकांच्या समस्या अत्यंत संयमाने ऐकून घेताना पाहिले आहे. मी लोकांना कोणतीही अपॉइंटमेंट न घेता थेट आमच्या घरात येताना पाहिलं आहे, कारण त्यांचा हा विश्वास होता की सचिन अहिर त्यांचं ऐकून घेतील, असं किरण अहिर म्हणाल्या.

“दररोज कोणाला तरी वैद्यकीय उपचारांसाठी मदत हवी असायची. कोणाला तरी शिक्षणासाठी आधाराची गरज असायची. तर कोणीतरी रोजगाराच्या शोधात असायचं. लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी जे काही शक्य असेल, ते त्यांनी नेहमी केलं. त्यांचं प्रत्येक प्रयत्न यशस्वी झाले का? कदाचित नाही. प्रत्येक व्यक्ती समाधानी झाली का? कदाचित नाही. पण एक गोष्ट मी पूर्ण खात्रीने सांगू शकते, मी त्यांना कधीही लोकांकडे पाठ फिरवताना पाहिलेलं नाही. त्यामुळे केवळ एका निर्णयावरून त्यांच्याबद्दल कोणताही न्यायनिवाडा करण्यापूर्वी, मी तुम्हाला विनंती करते की त्यापूर्वी त्यांनी केलेल्या वर्षानुवर्षांच्या कामाकडेही एकदा पहा. त्या लोकांना विचारा ज्यांचे कठीण दिवस थोडे सोपे झाले, कारण ते त्यांच्या पाठीशी उभे राहिले होते. त्या वृद्धांना विचारा ज्यांच्यासाठी त्यांनी मदतीचे दरवाजे उघडले. त्या तरुणांना विचारा ज्यांना त्यांनी नेहमी प्रोत्साहन दिले आणि एक नवी आशा दिली”, असं त्या म्हणाल्या.

“मी असा कोणताही दावा करत नाही की मी जे काही बोलले आहे, त्याशी प्रत्येक जण सहमत होईलच. पण एक मुलगी म्हणून मी एक गोष्ट निश्चितपणे सांगू शकते, मी माझ्या वडिलांना कधीही फक्त स्वतःसाठी जगताना पाहिलेलं नाही. मी त्यांना नेहमीच जनतेसाठी जगताना पाहिले आहे आणि माझ्या नजरेत, कोणत्याही लोकप्रतिनिधीची खरी ओळख तो कोणत्या राजकीय पक्षात आहे यावरून ठरत नाही, तर त्याचे हेतू, त्याचे काम आणि जनतेप्रती असलेली त्याची अटळ निष्ठा यावरून ठरते” , असं त्यांनी स्पष्ट केलं.