शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील राजकारणाला वेगळेच वळण लागले आहे. ४० पेक्षा जास्त शिवसेनेचे आमदार फोडण्यात शिंदेंना यश आल्यामुळे शिवसेना नेमकी कोणाची? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवसेनेकडून बंडखोर आमदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. ४८ तासांमध्ये भूमिका मांडा, नाहीतर आमदारकी रद्द केली जाईल. असा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. शिवसेनेत भांडणं लावून राष्ट्रवादी मजा पाहत असल्याचा आरोप शिरसाट यांनी केला आहे.

वर्षा बंगल्यावर शिवसेनेच्या नेत्यांना बंदी

संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं होते. त्यात त्यांनी आमदारांची व्यथा मांडली होती. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना स्वपक्षीय आमदार म्हणून आम्हाला वर्षा बंगल्यावर थेट प्रवेश कधीच मिळाला नाही. गेली अडीच वर्ष ‘वर्षा’ बंगल्याचे दरवाजे आमच्यासाठी बंदच होते. आम्हाला तासनंतास बंगल्याच्या गेटवर उभे राहावे लागत होते. अखेर कंटाळून आम्ही परत जायचो, असा आरोप संजय शिरसाट यांनी केला आहे.

विधापरिषद निवडणूकीच्या वेळी अविश्वास

आमच्या व्यथा पक्षात केवळ एकनाथ शिंदे साहेबच ऐकत होते. आदित्य ठाकरेंसोबत अयोध्येला जातानाही आम्हाला थांबवण्यात आलं. विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर आमच्यावर शिवसेनेकडून अविश्वास दाखवण्यात आला. प्रत्येक कठिण काळात एकनाथ शिंदेंचे दरवाजे आमच्यासाठी नेहमी उघडे असायचे. त्यामुळे आम्ही एकनाथ शिंदेसोबत असल्याचे शिरसाट म्हणाले.