scorecardresearch

“उपकार समजा, शिवसेनेची साथ मिळाली, नाहीतर….”; अमित शाह यांच्या आरोपानंतर अरविंद सावंत संतापले, म्हणाले…

मुंबई महापालिका म्हणजेच शिवसेनेचा भगवा झेंडा. हा झेंडा तिथून कुणीही हलवू शकत नाही, असेही सावंत म्हणाले.

“उपकार समजा, शिवसेनेची साथ मिळाली, नाहीतर….”; अमित शाह यांच्या आरोपानंतर अरविंद सावंत संतापले, म्हणाले…
अरविंद सावंतांचा अमित शाह यांना सल्ला

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचं लक्ष्य १५० जागा जिंकण्याचं असेल, अशी घोषणा त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये केली. तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा थेट उल्लेख करत त्यांनी आपल्याला धोका दिला. केवळ दोन जागांसाठी त्यांनी २०१४ मध्ये युती मोडली. मोदी आणि फडणवीसांच्या नावाने मतं मागून जिंकून आल्यानंतर आमच्याशी विश्वासघात केल्याचा आरोप शाह यांनी केला. या आरोपानंतर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. “भाजपाचा राज्यात विस्तार आणि केंद्रात केलेले सहकार्य यामुळे शिवसेनेच्या उपकाराची जाणीव ठेवा”, असा सल्ला सावंत यांनी शाह यांना दिला आहे.

हेही वाचा- “अभी नही तो कभी नही, अशा आवेशात लढा”; मुंबई महापालिकेसाठी देवेंद्र फडणवीसांनी रणशिंग फुंकले

मुंबई महापालिका म्हणजेच शिवसेनेचा भगवा झेंडा

भाजपचं सगळं तसंच असतं,त्यांचं नुसतं मिशन असतं, आज काय लोटस मिशन, परवा काय दुसरं मिशन असतं. त्यामुळं मूळ प्रश्न गहाळ असतात. अनेक गोष्टींपासून ते दूर आहेत. जनतेच्या प्रश्नांपासून दूर आहेत, मराठी माणसांच्या अस्मितेपासून ते दूर आहेत.”, असं अरविंद सावंत म्हणाले.

शिवसेना आणि मुंबई महानगरपालिका यांचं नातं दृढ आहे. कुणी कितीही वल्गना करुद्यात. बंगाल, पंजाब आणि दिल्लीत भूईसपाट झाले तेच मुंबईत होणार, मुंबईकर सूज्ञ आहेत. मुंबईकरांच्या आरोग्यासाठी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल मुंबई महापालिका चालवते, ते उद्धव ठाकरेंच्या दूरदृष्टीमुळं सुरु आहे. पोठात एक आणि ओठात एक ही पद्धत कुणाकडे आहे याची कल्पना सर्वांना आहे. अमित शाह त्यावेळी हरियाणाला का गेले होते. महाराष्ट्रात प्रश्न निर्माण झाला होता. तुम्ही शब्द दिल्याचं उद्धव ठाकरे सांगत होते. त्यावेळी तुम्ही महाराष्ट्रात न येता हरियाणाला गेलात. नंतर सहा महिन्यांनी बोलला होता ते गझनी सारखं असतं, असं अरविंद सावंत म्हणाले.

हेही वाचा- “एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले हे पवार कुटुंबियांचं…”, गोपीचंद पडळकरांची सुप्रिया सुळेंवर टीका; म्हणाले, “शरद पवार राज्यातले…”

भाजपानेच शिवसेनेला धोका दिला

२०१९ च्या निवडणूकांपूर्वी सेनेला असेच अव्हान देण्यात आले होते. मात्र, निकाल समोर येताच हेच अमित शाह हे मातोश्रीवर दाखल झाल होते. त्यानंतरच लोकसभा निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय झाला होता. त्या दरम्यानच, विधानसभा निवडणूकांचे स्वरुप कसे असणार हे देखील ठरल्याचे अरविंद सावंत यांनी सांगितले. एवढेच नाही तर जागा वाटपही कसे असणार निश्चित झाले होते. पण आकड्यांचा खेळ जुळला नाही आणि भाजपानेच शिवसेनेला धोक्या दिल्याचा आरोप सावंतांनी केला आहे.

शिवसेनेच्या उपकाराची जाणीव ठेवा

सुरुवातीच्या काळात भाजपाला राज्यात शिवसेनेची साथ मिळाली म्हणूनच हे आजचे चित्र आहे. एवढेच नाहीतर पंतप्रधान मोदी ज्या पदावर आहेत त्यामध्येही देखील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे योगदान राहिलेले आहे. काळाच्या ओघात आणि सत्तेपुढे याची त्यांना जाणीव राहिलेली नाही. किमान उभारीच्या काळात केलेले सहकार्य आठवूण तरी त्यांनी शिवसेनेबद्दल वक्तव्य करणे गरजेचे आहे असा सल्ला सावंत यांनी दिला आहे. बाळासाहेब ठाकरे म्हणत होते, की तुम्ही राष्ट्र बघा आम्ही राज्य सांभाळतो, पण सत्तेची हावस त्यांना स्वस्त बसू देत नव्हती, असा टोलाही त्यांनी शहा यांना लगावला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.