यवतमाळ वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या पाच शिक्षण संस्थांवर ईडीने छापेमारी सुरु केली आहे. या कारवाईनंतर खासदार भावन गवळी यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. यावेळी त्यांनी ईडीची कोणतीही नोटीस आली नसल्याचं सांगितलं. तसेच भाजपा आमदारावर ईडी लावणार का? असा प्रश्नही उपस्थित केला आहे. आज ईडीने भावना गवळींच्या ५ शिक्षण संस्थांवर कारवाई केली आहे. ईडीकडून या ठिकाणी कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. भाजपा नेते किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर ईडीचं पथक जिल्ह्यात दाखल झालं आहे. पाचही शिक्षण संस्थांच्या अधिकाऱ्यांनी ईडीकडून चौकशी सुरु आहे.

“मला ईडीचे कोणतीही नोटीस आलेली नाही. संस्थांवर ईडीचे अधिकारी आले आहेत. ते चौकशी करत आहेत. आणीबाणीसारखी वागणूक दिली जात आहेत. सर्वच शिवसेनेच्या मंत्री, नेत्यांना टार्गेट केलं जात आहे. माझ्या संस्थेचा एफआयर मी स्वत: नोंदवला होता. मला तो हिशोब मिळाला नाही म्हणून मी तक्रार दाखल केली. त्यातलं एकच वाक्य पकडायचं आणि त्यातला एकच आकडा घ्यायचा आणि ट्वीट करत मोठा राईचा पर्वत बनवायचा. असा काही दिवसांपासून राजकीय नेत्यांनी खेळ मांडलेला आहे. माझ्या संस्थेची जी चौकशी होत आहे. तिथे ग्रामीण भागातील मुलं शिक्षण घेत आहेत. गेल्या २० वर्षांपासून शिक्षण घेतलं आहेत. विद्या देण्याचं काम त्या ठिकाणाहून होत आहे. मी पाचवेळा या भागातून खासदार झाली आहे. कदाचित काही लोकांना ते चांगलं दिसत नाही.” अशी प्रतिक्रिया भावना गवळी यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची टीम लूटमार करतेय : किरीट सोमय्या

“भाजपाचे एक आमदार या भागातील आहेत. ते भूमाफिया आहेत. त्यांनीही ५०० कोटींचा घोटाळा केला आहे. केंद्र सरकार त्यांचीही ईडी चौकशी लावणार का? हा माझा प्रश्न आहे. माझी जशी चौकशी सुरु आहे. तशी त्यांचीही लावा ही विनंती आहे. केवळ शिवसेनेच्या लोकांना टार्गेट केलं जात आहे. आणीबाणी लावल्यासारखं दिसत आहे.राजकारणाची पातळी घसरत आहे. “,असा आरोपही त्यांनी केला.

कोण आहेत भावना गवळी?

भावना गवळी यांनी वयाच्या २४ व्या वर्षी लोकसभेत प्रवेश केला होता. यानंतर २००४, २००९, २०१४ आमि २०१९ असा सलग पाचवेळा त्यांनी लोकसभेत विजय मिळवाला. माजी खासदार स्व. पुंडलिकराव गवळी यांच्याकडून भावना गवळी यांना राजकारणाचे बाळकडू मिळाले. पुंडलिक गवळी यांच्या त्या सर्वात लहान कन्या आहेत. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी लहान वयातच राजकारणात प्रवेश केला. या कालावधीत त्यांनी यवतमाळ वाशिम मतदारसंघातील अनेक समस्या सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे लोकांनी त्यांना भरभरून मतं दिली.