शिवसेना खासदार भावना गवळी यांची सध्या ईडीकडून बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी चौकशी सुरू आहे. गेल्या महिन्यात २७ सप्टेंबरला ईडीनं भावना गवळी यांना समन्स बजावलं होतं. त्यांचे निकटवर्तीय सईद खान यांना देखील ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा भावना गवळी यांना ईडीनं समन्स बजावलं आहे. येत्या २० तारखेला अर्थात बुधवारी भावना गवळी यांना ईडीनं चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमध्ये झालेल्या कथित घोटाळ्यासंदर्भात ही चौकशी सुरू आहे.

याआधी भावना गवळींच्या निकटवर्तींयांना देखील ईडीकडून समन्स बजावून चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं आहे. ३० ऑगस्ट रोजी वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड आणि आसपासच्या ठिकाणी भावना गवळींशी संबंधित संस्थांमध्ये झडती घेण्यात आली होती. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी भावना गवळी यांच्यावर १०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. त्यासंदर्भात ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. भावना गवळी वाशिम-यवतमाळच्या शिवसेना खासदार असून त्यांना याआधी २७ सप्टेंबरला समन्स बजावून ४ ऑक्टोबरला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.

काय आहे प्रकरण?

वाशीम जिल्हय़ातील महामार्गाच्या कामांमध्ये शिवसैनिक आडकाठी आणत असल्याची तक्रार केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली होती. त्यानंतर गवळी यांनी १०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. “भावना गवळींनी ५५ कोटींचा बालाजी पार्टीकल बोर्ड हा कारखाना २५ लाख रुपयात घेतला. सन २०१९ मध्ये रिसोड येथील जनशिक्षण संस्था व महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या कार्यालयातून ७ कोटी रुपये चोरून नेल्याची तक्रार गवळी यांनी केली होती. ७ जुलै २०१९ रोजीच्या चोरीची तक्रार १२ मे २०२० रोजी करण्यात आली. १० महिने उशिरा तक्रार देण्याचे कारण काय? त्या कार्यालयात ७ कोटी कुठून आले?” असे सवाल सोमय्या यांनी केले होते. या संदर्भात केंद्रीय सहकार विभाग, सीबीआय, ईडी, स्टेट बँक, नॅशनल को- ऑप. डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन व अन्य ठिकाणी तक्रारी करण्यात आल्या आहेत.