Sanjay Raut On Sharad Pawar : अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक राजकीय घडामोडी सुरू आहेत. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. यातच पवार कुटुंबियांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांनी जोर धरला आहे, तर दुसरीकडे पार्थ पवार राज्यसभेवर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या घडामोडी सुरू असतानाच आता शिवसेना (ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे शरद पवार पुन्हा राज्यसभेवर जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. शरद पवार यांच्यासह आणखी सात राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ २ एप्रिल २०२६ रोजी संपत आहे. मात्र, संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना मोठं भाष्य करत म्हटलं की, ‘शरद पवारांना राज्यसभेसाठी कोणापुढेही हात पसरण्याची गरज नाही. महाविकास आघाडीकडे त्यांना निवडून आणण्याएवढी मते आहेत.’
संजय राऊत काय म्हणाले?
“शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीचा एक घटक आहे. बाकी सगळी हवाबाजी आणि पतंगबाजी आहे. शरद पवार यांची अशी मानसिकता दिसत आहे की आता थांबायला पाहिजे. पण आम्ही त्यांचे चाहते आहोत, आम्ही त्यांना सांगितलं. एकदा उद्धव ठाकरे हे देखील माझ्याबरोबर होते, तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की तुमच्या सारख्या नेत्याने दिल्लीत असणं म्हणजे महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज असण्यासारखं आहे. शरद पवार ज्या दिवशी ठरवतील की त्यांना पुन्हा निवडणूक लढवायची, तेव्हा त्यांना निवडून आणण्याएवढी ताकद महाविकास आघाडीकडे आहे. आमच्याकडे तेवढे मते नक्कीच आहेत”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
“शरद पवार यांना निवडून आणण्याएवढी मते महाविकास आघाडीकडे नक्कीच आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्या सारख्या नेत्याला कोणापुढे हात पसरण्याची गरज नाही. देवेंद्र फडणवीस किंवा आणखी कोणी, विशेषत: दिल्लीमधून अपशकुन आणण्याचा प्रयत्न केला तरी तो यशस्वी होणार नाही”, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

