Sanjay Raut Cancer : शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाची धडाडती तोफ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांच्यावर काही दिवसांपूर्वी मोठा आघात झाला होता. २०२५ च्या दिवाळीपासून संजय राऊत माध्यमांसमोर येत नव्हते. त्यांची प्रकृती ठिक नसल्याचे वृत्तही आले. पण संजय राऊतांना नेमकं काय झालं होतं? हे कोणालाही समजू शकलेले नव्हते. मात्र, त्या काळात त्यांना कर्करोगाचं निदान झालं होतं, अशी माहिती आता समोर येत आहे. याबाबत त्यांनीच आता खुलासा केला आहे. एबीपी कट्टा या कार्यक्रमात ते बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “दिवाळीच्या दोन-चार दिवस आधी कर्करोगाचं अचानक निदान झालं. त्याआधी आपण दौरे करतो, प्रवास करतो. कुठेतरी उशिरा पोहोचतो, उशिरा झोपतो म्हणून त्रास झाला असेल, असं आधी मला वाटलेलं. पण माझा भाऊ आमदार सुनिल राऊत याला काय वाटलं कोणास ठावूक, पण त्याने रक्त चेक केलं. तेव्हा निदान झालं की पोटात कॅन्सर आहे.”

ऐन दिवाळीत उपचार घेतले

कर्करोगासारख्या आजाराचं निदान झाल्यावर एखादा माणूस डगमगला असता. नैराश्येत गेला असता. पण याबाबत संजय राऊत म्हणाले, कर्करोगाचं निदान झालं तेव्हा मी हसलो, म्हटलं ठीक आहे. पण कुटुंबाने सांगितलं की उद्याच मला अॅडमिट व्हावं लागेल. मी मी म्हटलं, असं कसं शक्य आहे. सगळं शेड्युल ठरलंय. पण कुटुंबाने ऐकलं नाही. त्यांनी ऐन दिवाळीत किमोथेरपी, रेडिएशन दिलं. हे फार यातनादायी उपचार होते.”

आजारापेक्षा उपाय भयंकर

कर्करोगावरील उपचारांबाबतही संजय राऊत यांनी सांगितलं. आजारापेक्षा उपाय भयंकर असं म्हणत ते म्हणाले, “दीड महिना मी जवळजवळ बंदिस्तच होतोच. कधी घरी, कधी रुग्णालयात होतो. खूप त्रास असतो. पाणीही पिता येत नाही. पण यातून मी बाहेर येण्याचा प्रयत्न करतोय.”

सत्ताधाऱ्यांना आव्हान

दरम्यान, या मुलाखतीत संजय राऊतांनी अनेक राजकीय विधानेही केली आहेत. मुंबईत सभागृहात विरोधी बाकावर १०० पेक्षा जास्त नगरसेवक असणं हे सत्ताधाऱ्यांना आव्हान आहे. या निवडणुकीत मराठी माणूस ठाकरेंच्या मागे आहे हे दाखवून दिलं, असं संजय राऊत म्हणाले. भाजपाला कुठं जागा मिळाल्या, जिथं परप्रांतीय बहुसंख्य आहेत, ज्यांना मुंबई महाराष्ट्रात राहिली काय किंवा न राहिली काय? ज्यांना मराठी माणसाचं अस्तित्व या राज्याच्या राजधानीत अशा लोकांनी भाजपा आणि शिंदेंना मतदान केलं. जो या मुंबईचा भूमिपूत्र मूळ मराठी माणूस आहे तो ठाकरेंच्या मागे राहिला आहे, याचा आनंद आहे, असंही संजय राऊत म्हणाले.

ठाकरे बंधू एकत्र कसे आले?

“मी त्यांना एकत्र आणलं वगैरे असं काही नाही. कारण ठाकरे कुणाचं ऐकत नाहीत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांशीही माझे प्रेमाचे, आपुलकीचे, भावनात्मक संबंध आहेत. ते दोघंही माझ्यावर प्रेम करतात, ते माझ्यावर रागवतात. त्या दोघांनीही ठरवलं म्हणून ते दोघं एकत्र आले. दोघांच्याही मनात होतं ती लव्हस्टोरी आहे. थोडा वेळ लागतो पण ते जमतं तसं ते जमलेलं आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघंही मनाने चांगले आहेत. दोघांनाही हे वाटत होतं की कुटुंब म्हणून एकत्र राहिलं पाहिजे ती त्यांची तीव्र भावना होती, आहे. जे घडलं त्याबाबत दोघांनाही दुःख होतं. त्यातून एखादा कोंब फुटतो त्यातून ते बहरत जातं तसं ते झालं. सुरुवात राज ठाकरेंनी केली. एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की महाराष्ट्र आणि मराठी माणसांसाठी दोन पावलं मागे यायला तयार आहे. त्यावेळी उद्धव ठाकरेंसह आम्ही चर्चा केली की हे चांगले संकेत आहेत. मराठी माणसाला एकत्र व्हायला पाहिजे असं वाटतं आता एकत्र आलो नाही तर मराठी माणूस माफ करणार नाही. आता आपण मराठी माणसाचं राजकारण करु, हिंदू वगैरे नंतर बघू आपण, कारण आपण हिंदू आहोतच. मराठीपण टिकलं तर हिंदुत्व टिकेल, या भावनेतून पुढाकार घेतला पाहिजे. त्यानंतर मी राज ठाकरेंशी बोललो. त्यानंतर मग आम्ही एकत्र आलो आणि उत्तम चाललं आहे सगळं. असं संजय राऊत यांनी माझा कट्टा या एबीपी माझाच्या मुलाखत विशेष कार्यक्रमात सांगितलं.