scorecardresearch

“…म्हणून भावना गवळींऐवजी राजन विचारेंना प्रतोद केलं”, संजय राऊतांनी दिलं ‘त्या’ निर्णयावर स्पष्टीकरण!

संजय राऊत म्हणतात, “भावना गवळी उत्तम काम करत होत्या. पण त्यांच्या काही…!”

sanjay raut bhavana gawali
संजय राऊतांनी लोकसभा प्रतोदपदावर दिलं स्पष्टीकरण!

बुधवारी शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी भावना गवळी यांच्या जागी राजन विचारे यांची शिवसेनेचे लोकसभेतील मुख्य प्रतोदपदी नियुक्ती करण्याचं संसदीय कार्यमंत्र्यांना पाठवलेलं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं. या पत्रानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. एकीकडे विधानसभेतील प्रतोदपदावरून शिवसेना आणि बंडखोर आमदार गटामध्ये मोठा कलगीतुरा पाहायला मिळाला होता. शिंदे गटानं प्रतोद बदलल्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठ्या पेचप्रसंगाचा सामना करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी सतर्कतेचा उपाय म्हणून शिवसेनेनं प्रतोद बदलल्याचं सांगितलं जात होतं. यासंदर्भात आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे.

“व्हीप बदलणं हा पक्षाचा अंतर्गत विषय”

“व्हीप बदलणं हा पक्षाचा अंतर्गत विषय आहे. लोकसभेत मुख्य प्रतोद पदाचं महत्त्व फार असतं. पुढच्या अडीच वर्षात अनेक निर्णय होतील. कामाला गती मिळायला हवी. भावना गवळी उत्तम काम करत होत्या. पण त्यांच्या काही कायदेशीर लढायांमुळे त्यांना दिल्लीत संसदेत उपस्थित राहाता येत नाही असं अनेकदा दिसलं. अशा वेळी तिथे संसदेत मुख्य प्रतोद म्हणून व्यक्ती उपस्थित राहाणं आवश्यक असतं. काही आदेश काढायचे असतात, काही व्हीप काढायचे असतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी सगळ्यांशी बोलून हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्याची अंमलबजावणी झाली आहे”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

भावना गवळी ईडीच्या रडारवर

महाराष्ट्रात राजकीय घडामोडी सुरू होण्याच्याही आधी भावना गवळी ईडीच्या रडारवर होत्या. त्यांना ईडीकडून नोटीस देखील बजावण्यात आली होती. सध्या एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांना ईडीची भिती दाखवून तिकडे वळवण्यात आल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभेत देखील शिवसेनेला विधानसभेप्रमाणेच पेचप्रसंगाचा सामना करावा लागू नये, यासाठी खबरदारी म्हणून शिवसेनेनं हे पाऊल उचलल्याची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

“त्यांच्या नेत्यांनी एक कार्यशाळा घ्यावी आणि…”, बंडखोर आमदारांच्या आरोपांना संजय राऊतांचं प्रत्युत्तर!

भावना गवळींच्या ‘त्या’ पत्रामुळे संशय वाढला?

दोनच आठवड्यांपूर्वी एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांच्या बंडखोरीनंतर भावना गवळी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शिंदे गटाच्या कलाने निर्णय घेण्याची विनंती केली होती. “आपले आमदार हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपणास एक मोठा निर्णय घेण्यासाठी विनंती करत आहेत. त्यांच्या भावना समजून घेऊन त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता कठीण असला तरी शिवसैनिकांसाठी निर्णय घ्यावा ही विनंती”, अशा आशयाचं पत्र गवळी यांनी उद्धव ठाकरेंना लिहिलं होतं.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा मोठा निर्णय, भावना गवळींची लोकसभा प्रतोदपदावरून उचलबांगडी!

आनंद अडसूळांच्या राजीनाम्यावर राऊत म्हणतात…

दरम्यान, शिंदे गट सत्तेत बसला असताना आनंद अडसूळ यांनी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे शिवसेनेत इतर नेत्यांमध्ये देखील अंतर्गत अस्वस्थता असल्याचं बोललं जात आहे. त्यावर बोलताना राऊत म्हणाले, “ठीक आहे. त्यांच्या राजीनाम्याचं वृत्त आम्ही पाहिलं आहे. त्यांच्यावर देखील गेल्या काही महिन्यांपासून ईडीनं कारवाई केल्याचं वृत्त आम्ही वाचत होतो. त्यांच्या घरावर देखील ईडीच्या धाडी पडल्या होत्या. भाजपाकडून ईडी आणि अडसूळ यांच्याबाबतच्या काही बातम्या पसरवल्या जात होत्या. आज त्यांच्या राजीनाम्याचं वृत्त वाचलं. त्यावर पक्षप्रमुख योग्य तो निर्णय घेतील. भाजपाचे काही नेते तर त्यांना ईडीच्या माध्यमातून अटक करण्याबाबत बोलत होते. बऱ्याच नेत्यांवर काही प्रकारचे दबाव आहेत”, असं राऊत म्हणाले

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shivsena mp sanjay raut on bhavana gawali loksabha chief whip rajan vichare pmw

ताज्या बातम्या