Sanjay Raut on Thackeray Brother Alliance : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती अवघ्या राज्याने पाहिली. शिवसेनेला राम राम ठोकून राज ठाकरेंनी स्वतःचा मनसे पक्ष स्थापन केल्यापासून या दोन्ही बंधूंनी एकत्र यायला हवं अशी अपेक्षा सामान्य जनता व्यक्त करत होती. मात्र, दोन्ही नेत्यांमधील राजकीय वाद शिगेला पोहोचला होता. दरम्यान, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला दोन्ही पक्षांना आलेल्या अपयशामुळे दोन्ही पक्षांनी मराठीच्या मुद्द्यावरून मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने युती केली. याच युतीबाबत आता संजय राऊतांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी उत्तर देणं टाळलं.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना (ठाकरे) आणि मनसेला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळे महापालिकेवर यंदा ठाकरेंचा भगवा फडकला नाही. परिणामी ठाकरे बंधूंच्या या युतीचं आता पुढे काय होणार? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. त्यातच, स्वीकृत नगरसेवकपदावरून दोन्ही पक्षांमध्ये मतमतांतरे आहेत. त्यामुळे युतीत मिठाचा खडा पडला असल्याचं बोललं जातंय. यावर आज संजय राऊतांनी नो कॉमेंट्स असं उत्तर दिलं.
नो कॉमेंट्स
संजय राऊतांनी ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावली. असं असताना स्वीकृत नगरसेवक पदावरून ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्यावरून ठाकरे बंधूंच्या युतीत मिठाचा खडा पडला असल्याचं बोललं जातंय, असा प्रश्न पत्रकारांनी आज संजय राऊतांना विचारला. या प्रश्नावर संजय राऊतांनी दोन सेकंदाचा वेळ घेतला आणि “नो कॉमेंट्स” अशी प्रतिक्रिया दिली.
ठाकरे युती संपुष्टात येण्याची शक्यता
संजय शिरसाट म्हणाले, “संजय राऊतांना पुढचं कळायला लागलं आहे. महानगरपालिकांच्या निवडणुकीत मनसेला दिलेली वागणूक मनसेने आता त्यांच्या पक्षाची घेतलेली लाईन, त्यांचे इतर भेटीगाठी त्यामुळे उबाठा गटाचे सदस्य अस्वस्थ आहेत. महानगरपालिकेसाठी झालेली युती संपष्टात येण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया नो कॉमेंट्स आहेत.”
मनसेला प्रभाग समिती अध्यक्षपद देणार?
दरम्यान, ठाकरेंच्या सेनेकडून मनसेला स्वीकृत नगरसेवकाच्या ऐवजी प्रभात समितीचं अध्यक्षपद देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे दोन्ही पक्षात अद्यापही समन्वय सुरू असल्याचं समजतंय. यशवंत किल्लेदार, संदीप देशपांडे आणि सुरज चव्हाण यांची याबाबत बैठकही पार पडली.
