scorecardresearch

“देवेंद्र फडणवीसांनी त्या डबक्यात…”, एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर संजय राऊतांचा खोचक सल्ला!

राऊत म्हणतात, “काही लोकांनी राजकारणात डबकं तयार केलं आहे. डबक्यात बेडूक राहतात. फडणवीसांनी स्वत:…!”

sanjay raut devendra fadnavis
संजय राऊतांचा फडणवीसांना खोचक सल्ला (संग्रहीत छायाचित्र)

राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय महानाट्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षासोबतच आता एकनाथ शिंदे गटाकडून देखील आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालं आहे. सर्वोच्च न्यायालयाने १६ बंडखोर आमदारांना अपात्रतेपासून १२ जुलैपर्यंत संरक्षण दिल्यानंतर राजकीय पटलावर घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे भाजपाकडून वेट अँड वॉच ची भूमिका मांडली जात असली, तरी उच्चस्तरीय बैठका देखील सुरू असल्याचं बोललं जात असताना शिवसेनेने देखील आता एकनाथ शिंदेंबाबत वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याचं खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आहे. त्यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना देखील खोचक सल्ला दिला आहे. आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“..तर आमचंही वेट अँड वॉच”

भाजपाकडून घेतलेल्या भूमिकेप्रमाणेच शिवसेनेनंही वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याचं सांगत संजय राऊतांनी बंडखोर आमदारांना टोला लगावला आहे. “गुवाहाटीच्या डोंगरात आमदार बसले आहेत. नदी, डोंगर, पाणी असं सगळं आहे. त्यांना ११ जुलैपर्यंत आराम करण्याचे निर्देश आहेत. महाराष्ट्रात त्यांचं काही काम नाही. पण ११ तारखेनंतर आमच्या मागणीवर विचार होईल. शिवसेनेला मानणारी जनता अशा प्रकारच्या कोणत्याही विचाराला स्थान देत नाही. त्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत. समोरून वेट अँड वॉच कुणी करत असेल, तर आमचंही वेट अँड वॉच आहेच”, असं राऊत म्हणाले.

Maharashtra Political Crisis : “जहालत एक किस्म की मौत है”, संजय राऊतांचं सूचक ट्वीट!

देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला

“देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्याकडे ११६ आमदारांचं बळ आहे. इतका मोठा विरोधी पक्ष महाराष्ट्रात कधी निर्माण झाला नव्हता. हा विरोधी पक्ष विधायक काम करू शकतो ही आमची भूमिका आहे. फडणवीसांनी मुख्यमंत्रीपद सांभाळलं आहे. पण त्यांनी सध्या जे इथे डबकं झालं आहे, त्यात उतरू नये. त्यात त्यांची अप्रतिष्ठा आहे असं माझं त्यांना मित्र म्हणून सांगणं आहे. काही लोकांनी राजकारणात डबकं तयार केलं आहे. डबक्यात बेडूक राहतात. फडणवीसांनी स्वत: डबक्यात उतरून काही करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्या पक्षाची, मोदींची आणि स्वत: फडणवीसांची कमालीची अप्रतिष्ठा होईल असं माझं मत आहे. मला खात्री आहे की ते त्या डबक्यात किंवा नरकात उडी मारणार नाहीत”, अशा शब्दांत राऊतांनी खोचक शब्दांत सल्ला दिला आहे.

पाहा व्हिडीओ –

दरम्यान, एकनाथ शिंदे अजूनही आपले सहकारी असल्याचं संजय राऊत यावेळी म्हणाले. “एकनाथ शिंदे अजूनही आमचे सहकारी आहेत. पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये आहेत. ते अजूनही मुंबईत येऊ शकतात. त्यांच्याविषयी माझ्या मनात व्यक्तिगत कटुता असण्याचं कारण नाही”, असं राऊत म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shivsena mp sanjay raut to devendra fadnavis on eknath shinde rebel mla group pmw