कोकणातल्या चिपी विमानतळाच्या मुद्द्यावरून गेल्या दोन दिवसांपासून राज्यातलं वातावरण तापलं आहे. चिपी विमानतळाचं श्रेय नेमकं कुणाचं? यावरून शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात दावे-प्रतिदावे होऊ लागले आहेत. विमानतळासाठी शिवसेनेकडून कोकणात जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली असताना दुसरीकडे नारायण राणेंनी चिपी विमानतळाचं पूर्ण श्रेय भाजपाचं असल्याचा दावा केला आहे. शिवाय, उद्घाटनावेळी मोठा भांडाफोड करणार असल्याचं देखील त्यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे विमानतळाच्या मुद्द्यावरून राजकारण सुरू असताना आता शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणेंवर पलटवार केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनेला पोस्टरबाजी करण्याची गरज नाही

नारायण राणेंनी शिवसेनेकडून आणि विशेषत: विनायक राऊत यांनी केलेल्या पोस्टरबाजीवर निशाणा साधला होता. त्याविषयी बोलताना विनायक राऊत म्हणाले, “प्रामाणिकपणे लोकप्रतिनिधीची भूमिका बजावणाऱ्या आमच्यासारख्या सर्वांनाच आजचा दिवस आनंदाचा आहे. शिवसेनेला पोस्टरबाजी करण्याची गरज नाही. १९९९ साली विमानतळाची सुरूवात झाली. २००३ साली पहिलं आणि २००९ साली दुसरं भूमिपूजन झालं. त्यांनी भूमिपूजन करण्याचं काम अनेकदा केलं. पण खऱ्या अर्थाने विमानतळाच्या कामाला सुरुवात २०१६पासून झाली”, असं विनायक राऊत म्हणाले.

स्वत: भ्रष्टाचारात बुडालेल्यांनी…

दरम्यान, यावेळी राऊत यांनी नारायण राणेंना खोचक टोला देखील लगावला. “स्वत: काचेच्या घरात राहणाऱ्यांनी, भ्रष्टाचाराच्या चिखलात बुडालेल्यांनी इतरांवर आरोप करण्याचं धाडसच करू नये. शिवसेनेनं गेल्या दोन वर्षांत ज्या पद्धतीने सिंधुदुर्गात काम केलंय, ते पाहाता आम्ही केव्हाही पंचनामा करायला तयार आहोत. आम्हाला घाबरण्याचं कारण नाही”, असं राऊत म्हणाले आहेत.

शिवसेनेनं चिपी विमानतळासाठी काहीही केलं नसून त्यासाठीची परवानगी देखील आपणच आणल्याचा दावा नारायण राणेंनी केला आहे. त्यावर बोलताना विनायक राऊत म्हणाले, “राज्यसभा खासदारकीची ४ वर्ष काढली, त्यात परवानगी घेण्यासाठी काय केलं? टीका करायची की आनद घ्यायचा हे त्यांचं त्यांना कळलं पाहिजे”.

“उद्या जाहीर सभेत मी भांडाफोड करणार”, चिपी विमानतळ उद्घाटनापूर्वी नारायण राणेंचा इशारा!

जाहीर सभेत भांडाफोड करणार – नारायण राणे

दरम्यान, नारायण राणेंनी चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांचा भांडाफोड करणार असल्याचा इशारा दिला आहे. “शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सिधुदुर्गातल्या उद्योगपतींना फार त्रास आहे. गाडी घेऊन दिल्याशिवाय त्यांनी रस्त्याच्या चौपदरीकरणाचं काम सुरू करू दिलं नाही. शिवसेनेची हफ्तेबाजी आहे ही. उद्या जाहीर सभेमध्ये सगळ्यांची नावं मी सांगणार आहे. विकासाच्या आड येणारी ही लोक आहेत हे मी सांगणार. त्यांचा भांडाफोड करणार”, असं राणे म्हणाले आहेत. त्यामुळे आज नेमकं राणे काय बोलणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena mp vinayak raut slams narayan rane on chipi airport inauguration pmw
First published on: 09-10-2021 at 10:11 IST