मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले. राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंची भेट का घेतली ? या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? यासंबंधी वेगवेगळ्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. यादरम्यान या भेटीवर शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. यादरम्यान शिवसेना (शिंदे) पक्षाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केलेली पोस्ट चर्चेत आली आहे

शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. “राज ठाकरे यांचं जर काही काम असेल आणि उपमुख्यमंत्री म्हणून जर एकनाथ शिंदे हे त्याचं काम करत असतील तर आम्ही जास्त मनावर घेण्याचं कारण नाही. त्यांचं काही काम असू शकतं. आता उद्या महापालिकेच्या संदर्भात समजा आमचं एखादं काम राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे निघालं किंवा त्याबाबत आम्हाला बोलायचं असेल तर आम्ही मुख्यमंत्र्‍यांकडे जाऊ शकतो. त्यामुळे या भेटीत जास्त काही नाही”, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

यानंतर आता शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते आणि खासदार नरेश म्हस्के यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्टची विशेष चर्चा होताना दिसत आहे. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीचा फोटो पोस्ट करत म्हस्के यांनी हे दोन नेते एकत्र आले तर माझ्यासारख्या सर्व शिवसेना कार्यकर्त्यांना आनंदच होईल असे म्हटले आहे.

“काल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार @एकनाथ शिंदे साहेब आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष @राज ठाकरे साहेब यांची भेट झाली.. अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि अनेकांना पोटशूळही उठला… परंतु, बाळासाहेबांच्या मुशीतून घडलेले दोन कार्यकर्ते हिंदुत्वाच्या विचारासाठी, बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी एकत्र येणार असतील तर माझ्यासारख्या तमाम शिवसैनिकांना आनंदच होईल!!” असे म्हस्के म्हणाले आहेत.

दोन्ही नेत्यांमध्ये नेमकं काय चर्चा झाली?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या भेटीनंतर सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नंदनवन या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत विविध विषयावर चर्चा झाली. तसेच नंदनवन या बंगल्याच्या हेरिटेज वास्तूचे वेगळेपण जपत केलेल्या सुधारणांचे त्यांनी विशेष कौतुक केले. या बंगल्यात लावलेल्या मुंबईतील जुन्या हेरिटेज वास्तूंच्या फोटो फ्रेम्सची त्यांनी बारकाईने पाहणी केली आणि जुन्या मुंबईच्या आठवणींना उजाळा दिला”, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.