राज्यात नवनियुक्त एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री केल्यानंतर, केंद्रीय नेतृत्वाच्या या निर्णयामुळे प्रदेश भाजपच्या नेत्यांनाही धक्का बसला. या निर्णयावरुन विरोधकांकडूनही टीका टीप्पणी केली जात असतानाच आता शिवसेनेनं या विषयावर भाष्य केलं आहे. शिवसेनेनं पुन्हा एकदा, अडीच वर्षांपूर्वीच्या युतीचा उल्लेख करत मोठं मन या विषयावरुन भाजपाला टोला लगावला आहे. शिवसेनेनं अगदी वाजपेयी यांच्या, “छोटे मन से कोई बडा नही होता… टुटे मन से कोई खडा नही होता.” या कवितेचाही संदर्भ भाजपावर टीका करताना दिलाय.

नक्की वाचा >> सकाळीच आलेला अमित शाहांचा फोन, मराठा- ब्राह्मण समीकरणं अन् फडणवीसांच्या हातून निसटलेलं मुख्यमंत्रीपद; जाणून घ्या घटनाक्रम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्ट्रोक-मास्टर स्ट्रोक असे नाटकाचे प्रयोग
“महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करण्याचे जे राजकीय नाट्य घडवले जात आहे, त्या नाट्याचे अद्याप किती अंक बाकी आहेत याविषयी आज तरी कोणीही ठामपणे काही सांगू शकेल असे वाटत नाही. घडामोडीच अशा घडत आहेत किंवा घडवल्या जात आहेत की, राजकीय पंडित, चाणक्य व पत्रपंडितांनीही डोक्याला हात लावून बसावे. स्ट्रोक-मास्टर स्ट्रोक असे नाटकाचे प्रयोग सादर केले गेले. एक पडदा पडला की दुसरा पडदा वर असेही प्रकार झाले. या संपूर्ण राजकीय नाट्याची पडद्यामागून सूत्रे हलविणाऱ्या तथाकथित ‘महाशक्तीं’चा ‘पर्दाफाश’ही मधल्या काळात झाला. निदान त्यानंतर तरी हे नाट्य संपुष्टात येईल असा काहींचा कयास होता, मात्र तसे होताना दिसत नाही. उलट या नाट्यात आणखी रंग भरण्याचे काम होताना दिसत आहे,” असं शिवसेनेनं म्हटलंय.

‘मोठे मन’ आणि ‘पक्षनिष्ठेचे पालन’ असा एक बचाव
“शिवसेनेत बंडाळी घडवून महाराष्ट्राची सत्ता काबीज करायची हेच या नाट्याचे मुख्य उद्दिष्ट होते. त्यानुसार त्यातील पात्रांनी आपापली भूमिका वठवली. सुरत, गुवाहाटी, सर्वोच्च न्यायालय, गोवा, राजभवन आणि सर्वात शेवटी मंत्रालय अशा ठिकाणी त्याचे वेगवेगळे प्रयोग सादर झाले. मात्र सर्वात धक्कादायक असा क्लायमॅक्स झाला तो गुरुवारी संध्याकाळी राजभवनात या नाटकाचा शेवटचा वगैरे वाटणारा प्रयोग झाला तेव्हा. उपमुख्यमंत्री होणारे अचानक मुख्यमंत्री झाले आणि हमखास मुख्यमंत्री होणार असे वाटणाऱ्यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागले. पक्षादेश म्हणून ते त्यांनी स्वीकारलेही. या ‘क्लायमॅक्स’वर टीका, समीक्षण, परीक्षण असा भडिमार होत असताना ‘मोठे मन’ आणि ‘पक्षनिष्ठेचे पालन’ असा एक बचाव समोर आला. ‘‘फडणवीस यांनी मन मोठे करून मुख्यमंत्रीपदाऐवजी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले’’, असा युक्तिवाद आता केला जात आहे,” असं शिवसेनेनं म्हटलंय.

नक्की वाचा >> “BJP आणि RSS ला विचारलं पाहिजे, फडणवीसांचा अपमान करण्यासाठी त्यांना उपमुख्यमंत्री पद दिलंय का?”

वाजपेयी यांची कविता
“भारतीय जनता पक्षाचे स्वर्गीय नेते अटलबिहारी वाजपेयी यांनीही आपल्या एका कवितेत म्हटलेच आहे, “छोटे मन से कोई बडा नही होता… टुटे मन से कोई खडा नही होता.” मात्र, या ओळींपूर्वी याच कवितेत वाजपेयी म्हणतात,
हिमालय की चोटी पर पहुंच,
एव्हरेस्ट विजय की पताका फहरा,
कोई विजेता यदि ईर्ष्या से दग्ध,
अपने साथी से विश्वासघात करे
तो उसका क्या अपराध
इस लिये क्षम्य हो जायेगा कि
वह एव्हरेस्ट की उंचाई पर हुआ था?
नहीं, अपराध अपराध ही रहेगा
हिमालय की सारी धवलता
उस कालिमा को नहीं ढक सकती!
अर्थात ‘मन’ आणि ‘अपराध’ यांची सुस्पष्ट व्याख्या मांडणाऱ्या वाजपेयी युगाचा आणि त्यांच्या विचारसरणीचा देशाच्या राजकारणातून केव्हाच अस्त झाला आहे,” असा उल्लेख या लेखात आहे.

नक्की वाचा >> शिंदे विरुद्ध शिवसेना : “महाविकास आघाडीने स्वत:च्या सगळ्या आमदारांना घेऊन राष्ट्रपतींसमोर…”; प्रकाश आंबेडकरांचा सल्ला

पक्षादेश शिरोधार्य मानणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांच्या हातून…
“काळ्याचे पांढरे व पांढऱ्याचे काळे करणारे नवे युग आता तिथे अवतरले आहे. त्यामुळेच ‘छोटे मन’ आणि ‘मोठे मन’ यांच्या व्याख्या नव्याने सांगितल्या जात आहेत. कराराप्रमाणे दिलेला शब्द पाळण्याचे ‘मोठे मन’ भाजपाने अडीच वर्षांपूर्वीच दाखवले असते तर बचाव म्हणून ‘मोठ्या मना’ची ढाल समोर करण्याची वेळ त्या पक्षावर आली नसती. लोकशाहीचे वस्त्रहरण करून घडविण्यात आलेल्या महाराष्ट्रातील या राजकीय नाट्याचे आणखी किती अंक समोर येणार हे आता बघावे लागेल. जे झाले ते झाले, पण महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री आणि पक्षादेश शिरोधार्य मानणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांच्या हातून महाराष्ट्रहिताचेच कार्य घडो हीच अपेक्षा आहे! हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, आंधळा धृतराष्ट्र नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे,” असं शिवसेनेनं म्हटलंय.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena on devendra fadnavis appointed as deputy chief minister scsg
First published on: 02-07-2022 at 07:44 IST