प्रकाश आंबेडकर समाजाचे मालक नाहीत, वंदे मातरम् म्हणावेच लागेल: शिवसेना

जीनांचा आत्मा सध्या मियाँ ओवेसी यांच्या शेरवानीत घुसला आहे, पण त्यांच्या शेरवानीच्या नाडीत प्रकाश आंबेडकर यांची मान अडकली असल्याने तेदेखील मुस्लिम लीगचीच भाषा बोलत

संग्रहित छायाचित्र

सध्या प्रकाश आंबेडकरांचा ‘निकाह’ एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांच्याशी झाला असून त्यामुळे त्यांना राष्ट्रविरोधी झटके येऊ शकतात. पण प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी हे समाजाचे मालक नाहीत. या देशात वंदे मातरम् म्हणावेच लागेल, असे शिवसेनेने म्हटले आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी दोन दिवसांपूर्वी ‘वंदे मातरम्’ला विरोध दर्शवला होता. देशाचे राष्ट्रगीत असताना ‘वंदे मातरम्’ची सक्ती कशासाठी असा सवाल त्यांनी विचारला होता. बुधवारी सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीकेची झोड उठवली. प्रकाश आंबेडकरांचा ‘निकाह’ सध्या एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांच्याशी झाला असून ओवेसी हे मुस्लिम लीगचे नवे अवतारपुरुष आहेत. मुसलमानांना भडकवण्याचे आणि त्यांना मुख्य राष्ट्रीय प्रवाहापासून तोडण्याचे काम पाकिस्तानचे मूळपुरुष बॅ. जीना यांनी केले. अशा जीनांचा आत्मा अधूनमधून भारतातील मुसलमान पुढाऱ्यांत घुसत असतो. सध्या तो मियाँ ओवेसी यांच्या शेरवानीत घुसला आहे, पण त्यांच्या शेरवानीच्या नाडीत प्रकाश आंबेडकर यांची मान अडकली असल्याने तेदेखील मुस्लिम लीगचीच भाषा बोलत असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

‘वंदे मातरम्’ला ओवेसी ‘उरुस’ मंडळाचा विरोध समजण्यासारखा आहे. पण त्यांच्या विरोधाला न जुमानता देशातील मुसलमान ‘वंदे मातरम्’चे गान करीत आहेत. ‘वंदे मातरम्’ला आंधळा विरोध करणाऱ्यांच्या डोक्यात हा ‘प्रकाश’ पडेल का हा प्रश्नच असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. ‘वंदे मातरम्’ म्हणजे मातृभूमीला वंदन. तसे करण्यासाठी येथील मुसलमानांना ओवेसी किंवा प्रकाश आंबेडकर यांना विचारण्याची आवश्यकता नाही, असेही शिवसेनेने सुनावले.

ओवेसी यांच्या नादाने प्रकाश आंबेडकरांनी स्वतःचे जे अधःपतन करून घेतले असून आंबेडकरी समाज त्यांना माफ करणार नाही. बाबासाहेबांना जे कधीच मान्य झाले नसते असे ‘जीना छाप’ राजकारण प्रकाश आंबेडकर यांनी सुरू केल्याचा आरोप शिवसेनेने केला.
ओवेसी यांच्या मागण्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातवाने आंधळयासारखा पाठिंबा देणे हे क्लेशदायक असून त्यांची ही भूमिका संविधानद्रोही म्हणजेच बाबासाहेबांच्याच विरोधात आहे, असेही शिवसेनेने नमूद केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shivsena party chief hits out prakash ambedkar over vande matram