विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली होती. ते आपल्यासोबत जवळपास ३० हून अधिक आमदार घेऊन गुजरातमधील सुरत याठिकाणी गेले होते. त्यानंतर ते सर्व आमदारांना घेऊन आसाममधील गुवाहाटी याठिकाणी गेले होते. तेथून सर्व आमदार गोव्यात गेले होते. तब्बल अकरा दिवसांच्या प्रवासानंतर हे सर्व आमदार अखेर मुंबईत दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदेसह ३९ बंडखोर आमदार काही वेळापूर्वी मुंबई विमानतळावर दाखल झाले आहेत.

मुंबईत दाखल होताच मुंबईतील ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाची संयुक्त बैठक पार पडत आहेत. या बैठकीला एकनाथ शिंदेसह सर्व बंडखोर आमदार उपस्थित आहेत. सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपा आणि शिंदे गटाची ही पहिलीच बैठक आहे. उद्या विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक असल्याने हे सर्व आमदार मुंबईत दाखल झाले आहेत. या बैठकीत अध्यक्ष पदाच्या निवडणुकीबाबत रणनीती ठरवली जाणार आहे.

ज्या हॉटेलमध्ये ही बैठक सुरू आहे, येथे मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. हॉटेलमध्ये केवळ आमदारांनाच प्रवेश देण्यात येत आहे. आमदारांची सुरक्षाव्यवस्था आणि पीए यांना देखील बाहेर थांबवण्यात येत आहे. संबंधित बैठकीत नेमके कोणते निर्णय होतात? याकडे सर्वाचं लक्ष लागलं असून अध्यक्षपदाची निवडणूक ही भाजपा आणि शिंदे गटाची पहिली परीक्षा ठरणार आहे.

खरंतर, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आणि महाविकास आघाडीने आपल्या उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. भाजपाकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक विधान परिषद आणि राज्यसभेप्रमाणे चुरशीची ठरणार आहे. उद्या ३ जुलै रोजी ही निवडणूक पार पडणार आहे.