मागील १५ दिवसात महाराष्ट्रातील राजकारणात उलथापालथ झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहेत. ३ आणि ४ जुलै रोजी विधानसभेत विशेष अधिवेशन पार पडल्यानंतर अखेर १५ दिवसांनी “काय झाडी, काय डोंगार” फेम सांगोला विधानसभा मतदारसंघाचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील आपल्या मतदार संघात परतले आहेत. यावेळी जनतेनं त्यांचं जंगी स्वागत केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, बंडखोरी झाल्यानंतर शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर विविध आरोप आणि टीका केली होती. बंडोखर आमदारांना रेडा किंवा वेश्या देखील संबोधतलं होतं. याबाबत विचारल्यानंतर शहाजीबापू पाटलांनी थेट प्रत्युतर देणं टाळलं आहे. “राऊतांच्या नादी लागण्यात काय अर्थ आहे? त्यांच्याबाबत सांगोल्याच्या मैदानात बोलणार” असंही ते म्हणाले आहे.

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “मी माझ्या तालुक्यात आलो आहे. माझ्या तालुक्यातील तमाम जनतेनं एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला भरभरून पाठिंबा दिला आहे. हे जमलेल्या गर्दीवरून लक्षात येत असेल. हा वैचारिक तालुका आहे. गेल्या ५०-६० वर्षांपासून या तालुक्याचं नेतृत्व वैचारिक विचारातून झालं आहे. ही जी भूमिका आहे, ती व्यक्तीगत माझी शहाजीबापू पाटलांची भूमिका नाही, ही माझ्या सांगोला तालुक्यातील जनतेची भूमिका आहे. आम्हाला एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री पाहिजे होते. ते आता मुख्यमंत्री झालेत, त्यामुळे मी आनंदी आहे.” असंही ते म्हणाले.

खंरतर, बंडखोरी झाल्यानंतर एकनाथ शिंदेसह सर्व आमदार आसाममधील गुवाहाटी याठिकाणी गेले होते. दरम्यान शहाजीबापू पाटील आणि त्यांच्या एका कार्यकर्त्यामधील ऑडिओ संवाद व्हायरल झाला होता. त्यामध्ये त्यांनी गुवाहाटी येथील परिस्थितीचं वर्णन “काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, सर्व ओके मदी हाय” अशा शब्दांत केलं होतं. त्यांचा हा ऑडिओ कॉल व्हायरल झाल्यानंतर ते चर्चेत आले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena rebel mla shahaji bapu patil on shivsena mp sanjay raut rmm
First published on: 05-07-2022 at 20:03 IST