बंडखोर शिवसेना आमदारांना आता केंद्राची ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा, कार्यालय तोडफोडीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय!

काही बंडखोर आमदारांच्या कार्यालयांवर तोडफोडीच्या घटना घडल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

बंडखोर शिवसेना आमदारांना आता केंद्राची ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा, कार्यालय तोडफोडीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय!
बंडखोर शिवसेना आमदारांना आता केंद्राची वाय प्लस दर्जाची सुरक्षा!

एकनाथ शिंदेंसोबत बंडखोरी करून गुवाहाटीमध्ये थांबलेल्या शिवसेना आमदारांना आता केंद्र सरकारची सुरक्षा पुरवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. एएनआयनं सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये गुवाहाटीमध्ये थांबलेल्या शिवसेना आमदारांपैकी काहींच्या कार्यालयांमध्ये तोडफोड झाल्याची घटना समोर आली होती. त्यामुळे या आमदारांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाल्याचं बोललं जात होतं. यासंदर्भात महाविकास आघाडी सरकारवर देखील आरोप केला जात होता. या पार्श्वभूमीवर आता या बंडखोर आमदारांपैकी जवळपास १५ आमदारांना केंद्र सरकराने वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.

शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी पाटील, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयांमध्ये तोडफोडीच्या घडना समोर आल्या होत्या. शिवसेनेनं भाजपासोबत हातमिळवणी करून नैसर्गिक युती करावी आणि राज्यात सत्ता स्थापन करावी, अशी अट बंडखोर आमदारांच्या गटाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घालण्यात आली आहे.

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडणार नसल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केल्यानंतर या सगळ्या घडामोडी नेमक्या कोणत्या दिशेने जात आहेत, याविषयी तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. त्यातच आता आमदारांना केंद्रीय सुरक्षा देण्याचा निर्णय समोर आल्यामुळे त्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Video : “महाराष्ट्रात माकडांचा खेळ सुरू आहे, एका…”, ओवेसींची शिवसेनेतील बंडखोरीवर खोचक प्रतिक्रिया!

संजय राऊतांचं खुलं आव्हान

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना खुलं आव्हान दिलं आहे. “जे फुटले त्यांची शिवसेना असू शकत नाही. तुमच्यात धमक आहे तर आमदारकीचे राजीनामे द्या. मी नारायण राणेंना मानतो. त्यांचा गट लहान होता. पण त्यांनी राजीनामे दिले. ते निवडणुकीला सामोरे गेले. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदेंचे २२ लोक फुटले. राजीनामा दिला. निवडणुकीला सामोरे गेले, जिंकून आले. त्यांनी सरकार बनवलं. तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही राजीनामे द्यायचे. कितीही असू द्या. ५४ असू द्या. राजीनामे द्यायचे आणि आपापल्या मतदारसंघात जाऊन निवडणुका लढवण्याची हिंमत दाखवा. हे माझं खुलं आव्हान आहे. तुम्ही गुवाहाटीत बसून आम्हाला शिवसेनेची, हिंदुत्वाची अक्कल शिकवणार”, अशा शब्दांत राऊतांनी बंडखोर आमदारांच्या गटाला आव्हान दिलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shivsena rebel mla y security from central government crpf jawan pmw

Next Story
Maharashtra political crisis: रश्मी ठाकरे मैदानात; बंडखोर आमदारांच्या पत्नींशी साधतायत संपर्क
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी