अयोध्येतील राममंदिर हे रामभक्तांचा त्याग, संघर्ष व बलिदानातून उभे राहिले. हाच इतिहास आहे. एखाद्या घोटाळय़ाचा डाग त्या मंदिरावर पडत असेल तर पंतप्रधान मोदी, सरसंघचालक भागवतांना त्यात हस्तक्षेप करावाच लागेल अशी मागणी शिवसेनेने सामना संपादकीयमधून केली आहे. यावेळी शिवसेनेने कोणी जाणीवपूर्वक बदनामी करत असेल तर त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.

“अयोध्येत प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर व्हावे ही तर जगभरातील तमाम हिंदूंचीच इच्छा आहे. त्या राममंदिरासाठी हिंदूंना मोठा लढा त्यांच्याच हिंदुस्थानात द्यावा लागला. अयोध्येच्या भूमीवर साधू, संत, करसेवकांनी रक्त सांडले. शरयू नदी हिंदूंच्या रक्ताने लाल झाली. बाबरीचे घुमट शिवसैनिकांनी तोडताच मुंबईसह देशातील अनेक भागांत दंगली उसळल्या. त्यातही असंख्य हिंदूंना प्राण गमवावे लागले. गुजरातमधील साबरमती एक्सप्रेसवर हल्ला झाला. ते पुढे ‘गोध्राकांड’ म्हणून इतिहासात नोंदले गेले. त्या गोध्राकांडानंतरही अयोध्येहून परतणाऱ्या असंख्य रामसेवकांचे मृत्यू झाले. मुंबईत 93 सालात भीषण बॉम्बस्फोट मालिका घडवून धर्मांध पाकडय़ांनी शेकडो निरपराधांचे प्राण घेतले. हा अयोध्या लढय़ाचाच बदला होता. अशा असंख्य हिंदूंच्या त्यागातून, बलिदानातून, प्रदीर्घ कायदेशीर संघर्षातून सर्वोच्च न्यायालयाच्या कृपेने अयोध्या नगरीत प्रभू श्रीरामाचे मंदिर उभे राहत असतानाच एक नवीनच घोटाळा बाहेर आला आहे,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.
“राममंदिराची उभारणी व्हावी यासाठी केंद्र सरकारने एक ‘न्यास’ म्हणजे विश्वस्त संस्था स्थापन केली. राममंदिर निर्माणसंदर्भातील सर्व आर्थिक व्यवहार हा ‘न्यास’च करणार होता व या संस्थेतील सर्व लोक हे प्रखर हिंदुत्ववादी, राष्ट्रवादी असल्याने कोणत्याही शंकेला जागा नाही, पण ‘आप’ पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी एक धक्कादायक माहिती समोर आणली आहे. फक्त 10 मिनिटांपूर्वी दोन कोटींना घेतलेली जमीन राममंदिर निर्माण न्यासाने 18.5 कोटींना विकत घेतल्याचा स्फोट संजय सिंह यांनी केला. या सर्व प्रकरणाची सीबीआय आणि ईडीकडून चौकशीची मागणी समोर आल्याने राममंदिर निर्माणामागे नक्की काय गडबड सुरू आहे, असा संशयाचा धूर निघाला आहे,” असं शिवसेनेने सांगितलं आहे.

March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
eknath shinde
आरोग्य विभागातील १४४६ वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया पूर्ण, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पदस्थापनेचा आदेश!
good touch bad touch
मुलेही ‘गुडटच-बॅडटच’चे शिकार! सामाजिक कार्यकर्त्या दिशा पिंकी शेख म्हणतात, घराचा वंश पुढे चालवू शकत नसल्याने…
Pm modi meeting at Yavatmal
यवतमाळ : पंतप्रधानांची सभा, रस्ते बंद, विद्यार्थ्यांची गैरसोय…

अयोध्येत जमीन खरेदीत गैरव्यवहार नाही!

“अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर साधारण साठ एकर परिसरात उभे राहात आहे. त्यासाठी जमीन संपादन करावी लागत आहे. अयोध्येतील अनेक आश्रम, मठ, धार्मिक संस्थांच्या जमिनी त्यासाठी ताब्यात घेतल्या जात आहेत व त्या जमिनीचा मोबदला मूळ मालकांना दिला जात आहे. ज्या जमिनीचा संशयास्पद व्यवहार समोर आणला आहे. तो प्रकार समजून घेतला पाहिजे. बाबा हरिदास यांनी ही जमीन सुलतान अन्सारी आणि रवी मोहन तिवारी यांना विकली. त्यानंतर त्यांनी ही जमीन रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला विकली. हा व्यवहार फक्त दोन-पाच मिनिटांत झाला. बाबा हरिदास यांनी ही जमीन दोन कोटींना विकली. पुढच्या काही मिनिटांत हीच जमीन राममंदिर ट्रस्टला 18.5 कोटींना विकली. काही मिनिटांतच जमिनीचा भाव दोन कोटींवरुन 18.5 कोटी कसा काय होऊ शकतो?,” अशी विचारणा शिवसेनेने केली आहे.

“अयोध्येचे महापौर ऋषिकेश उपाध्याय व ट्रस्टचे विश्वस्त अनिल मिश्रांच्या उपस्थितीत हा व्यवहार झाला. मुख्य म्हणजे 17 कोटी रुपये संबंधितांच्या खात्यावर जमा करण्यात आले. हे सर्व प्रकरण नक्की काय आहे? त्याविषयी संभ्रम आहे. तो संभ्रम दूर करण्याचे काम रामजन्मभूमीचे प्रमुख महासचिव चंपत राय यांनाच करावे लागेल. रामजन्मभूमी स्थानावर मंदिर निर्माण करावे यासाठी रामलल्लांच्या नावाने अयोध्येत बँक खाते उघडण्यात आले असून त्या खात्यावर जगभरातील कोटय़वधी श्रद्धाळूंनी शेकडो कोटी जमा केले आहेत. अयोध्येत राममंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी, सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री योगी महाराजांच्या हस्ते संपन्न होताच विश्व हिंदू परिषदेचे चार हजारांवर स्वयंसेवक देशभरात घरोघर फिरून सामान्यांकडून राममंदिर निधीसाठी पावत्या फाडत होते. त्यातूनही कोटय़वधी रुपये जमा झाले. शिवसेनेनेही एक कोटीचा निधी मंदिर कार्यासाठी दिलाच आहे. अयोध्येतील राममंदिर उभारणीचे काम व त्यामागचा व्यवहार पारदर्शक, प्रामाणिक पद्धतीने व्हावा. रामभक्तांच्या श्रद्धेस तडा जाईल असे काही घडू नये ही अपेक्षा असतानाच जमीन व्यवहाराचे संशयास्पद प्रकरण समोर आले. ते खरे की खोटे याचा लगेच खुलासा झाला तर बरे! राममंदिर कार्य हे राष्ट्रीय अस्मितेचे कार्य आहे. या कार्याची कोणी जाणीवपूर्वक बदनामी करत असेल तर त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे,” असंही मत शिवसेनेने व्यक्त केलं आहे.