तौक्ते वादळानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त गुजरातचा दौरा करत आर्थिक मदत जाहीर केल्याने राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून नाराजी जाहीर केली जात आहे. मोदींकडून महाराष्ट्र तसंच इतर राज्यांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याची टीका राज्यातील नेते करत आहेत. शिवसेनेने या मुद्द्यावरुन भाष्य करत विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केंद्राकडे मदत मागितली पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे. महाराष्ट्रासोबत झालेला सापत्नभाव फडणवीस यांना तरी पटेल काय? अशी विचारणाही शिवसेनेने सामना संपादकीयमधून केली आहे.

काय म्हटलंय संपादकीयमध्ये –
“गुजरातच्या हवाई मार्गाने पंतप्रधानांना गोव्याच्या नुकसानीचीदेखील पाहणी करता आली असती. पंतप्रधानांचे हे वागणे भेदभावाचे आहे व महाराष्ट्राला मदत न करण्याची त्यांची भूमिका धक्कादायक असल्याचे मत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी मांडले. महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे तत्काळ कोकणच्या दौऱ्यावर गेले. त्यांनी चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. जनता व अधिकाऱ्यांशी चर्चा केली. वादळग्रस्तांना राज्य सरकारने भरघोस मदत द्यावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. हीच मागणी त्यांनी अधिक जोरकसपणे केंद्राकडेही केली पाहिजे,” अशी अपेक्षा शिवसेनेने व्यक्त केली आहे.

“फडणवीस हे महाराष्ट्राचे आहेत. त्या नात्याने पक्ष वगैरे बाजूला ठेवून त्यांनी गुजरातच्या बरोबरीत महाराष्ट्राला आर्थिक पॅकेज मिळावे असे मोदी साहेबांना सांगायला हवे. गुजरातला चोवीस तासांत हजार कोटी व महाराष्ट्राला काहीच नाही हा सापत्नभाव फडणवीस यांना तरी पटेल काय?,” अशी विचारणा शिवसेनेने केली आहे.

“कोकणातील शेती, फळबागा, मासेमारी व्यवसायाचे नुकसान झालेच आहे तसे पर्यटन व्यवसायालाही वादळाचा तडाखा बसला आहे. कोरोनामुळे हा व्यवसाय आधीच ठप्प झाला. त्यात हा वादळाचा तडाखा. सावंतवाडी, तारकर्ली, मालवण, देवबाग, अलिबाग, वसई, विरार, केळवे, माहीम समुद्रपट्टीवरील पर्यटन व्यवसाय कालच्या तडाख्याने जमीनदोस्त झाला. त्यामुळे हजारो लोकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला. या सगळय़ांची काळजी महाराष्ट्र सरकार घेईलच, पण गुजरातला एक हजार कोटी देणाऱ्या केंद्राने महाराष्ट्र आणि गोव्याच्या बाबतीत भेदभाव का करावा?,” असा सवाल शिवसेनेने विचारला आहे.