“उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून भाजपाची अवस्था कळपात वाघ शिरल्यानंतर भेदरलेल्या मेंढरांसारखी”

“शिवसेनेमुळे राजकीय विरोधकांची झोप उडाली असून त्यांना मोगलांच्या घोडय़ाप्रमाणे जळी-स्थळी शिवसेनाच दिसू लागली आहे”

Shivsena, Saamana Editorial, Maharashtra CM Uddhav Thackeray, BJP, Central Government
"शिवसेनेमुळे राजकीय विरोधकांची झोप उडाली असून त्यांना मोगलांच्या घोडय़ाप्रमाणे जळी-स्थळी शिवसेनाच दिसू लागली आहे" (Shivsena/Twitter)

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून कळपात वाघ शिरल्यावर मेंढरांची जशी अवस्था होते तशी अवस्था भारतीय जनता पक्षाची झाली असल्याचं शिवसेनेने म्हटलं आहे. दसऱ्याच्या निमित्ताने शिवसेनेने पुन्हा एकदा सामना संपादकीयमधून भाजपावर निशाणा साधला आहे. “शिवसेना हा एक ज्वलंत विचार आहे. सदैव उसळणारा ज्वालामुखीच आहे. शिवसेनेमुळे राजकीय विरोधकांची झोप उडाली असून त्यांना मोगलांच्या घोडय़ाप्रमाणे जळी-स्थळी शिवसेनाच दिसू लागली आहे. ही वाताहत पाहून आम्हाला या मंडळींची कींव करावीशी वाटते,” असा टोला त्यांनी शिवसेनेने लगावला आहे.

काय आहे संपादकीयमध्ये –

“महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यापासून कळपात वाघ शिरल्यावर मेंढरांची जशी अवस्था होते तशी अवस्था भारतीय जनता पक्षाची झाली आहे. सध्या या मंडळींची जी बेताल वक्तव्ये चालली आहेत त्या बातम्या वाचून आणि ऐकून लोकांची तर खूप करमणूक होत असते. पुन्हा ‘धाड’ प्रयोगही सुरूच आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर दसऱयाचे सोने लुटायला महाराष्ट्र सज्ज झाला आहे. महाराष्ट्र हा सोन्यासारखा प्रदेश आहे. हे राज्य कायम तेजस्वी सूर्यासारखे तळपत राहिले. त्याच तेजाची माणसे येथे जन्मास आली. त्यामुळे विचारांचे सोने महाराष्ट्र सदैव उधळत राहिला. दोन वर्षांपासून महाराष्ट्रात ‘ठाकरे’ सरकार काम करीत आहे. हे सरकार नीट चालू नये म्हणून दिल्लीश्वरांनी मोठा खटाटोप आणि आटापिटा चालवला आहे. खोटेपणाची सर्व आयुधे वापरून सरकारच्या पाठीत घाव घालण्याची एकही संधी राजकीय विरोधकांनी सोडली नाही. त्या सगळ्यांना चोख उत्तर देण्यासाठी महाराष्ट्राला शमीच्या झाडावरील शस्त्र आता काढावीच लागतील,” असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

“महाराष्ट्राला कमजोर करायचे, महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान मोडून काढायचा हे दिल्लीचे धोरणच आहे, पण या बेईमान धोरणाची पालखी वाहणारे सूर्याजी पिसाळ आजही महाराष्ट्रात निपजत आहेत व महाराष्ट्राला याच दुश्मनांपासून सगळ्यात जास्त धोका आहे. महाराष्ट्रावर ‘लोड शेडिंग’ म्हणजे अंधाराचे संकट कोसळताना दिसत आहे. केंद्र सरकारने कोळशाच्या बाबतीत जो ढिसाळ आणि भ्रष्ट कारभार केला, त्यामुळे महाराष्ट्रासह पाच राज्ये अंधारात ढकलली जातात की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. एकाएकी ही कोळसा टंचाई का निर्माण झाली? केंद्र सरकारने मर्जीतल्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी कृत्रिम कोळसा टंचाई निर्माण केली की काय? असे प्रश्न विचारले जात आहेत. कारण केंद्र सरकारवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही. उद्योगपतींच्या फायद्यासाठी हे ‘व्यापारी’ सरकार म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी कोणत्याही थराला जाऊ शकते,” अशी टीका शिवसेनेने केली आहे.

“केंद्रातले भाजप सरकार म्हणे आझादीचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. पण देशात बोलण्याचे, लिहिण्याचे स्वातंत्र्य आज खरेच उरले आहे का? जे सरकारला प्रश्न विचारतात, खडे बोल सुनावतात त्यांच्यावर सीबीआय, ईडी, एनसीबी, आयकर खात्याच्या धाडी घालून दहशत निर्माण केली जाते. खोटे गुन्हे दाखल करून रावणी राज्याची पताकाच फडकवली जाते. याला काय स्वातंत्र्य म्हणायचे? शेतकऱयांना त्यांचे हक्क मागण्याचे स्वातंत्र्य नाही. आपले न्याय्य हक्क लोकशाही मार्गाने मागणाऱया शेतकऱयांना मंत्रीपुत्र गाडीखाली चिरडून मारतात. पुन्हा शेतकऱयांना चिरडून मारणाऱया या गुन्हेगारांना अटक करा, अशी मागणी करण्याचे स्वातंत्र्य राजकीय पक्षांना नाही. ती मागणी करणाऱया प्रियंका गांधीना तुरुंगात डांबले जाते. बेरोजगारांना काम करण्याचे स्वातंत्र्य नाही. विद्यापीठांत मोकळेपणाने बोलण्याचे स्वातंत्र्य नाही. संपूर्ण देश जणू बंदिवान बनवला आहे. बेडय़ांत जखडून टाकला आहे. कसली आहे आझादी? कसले स्वातंत्र्य उरले आहे? तेव्हा आझादीचा अमृत महोत्सव साजरा करण्याचे ढोंग करू नका,” अशा शब्दांत शिवसेनेने सुनावलं आहे.

“या ढोंगाचा बुरखा फाडण्याचे काम आता एकत्रितपणे करायला हवे. एकजुटीची वज्रमूठ हीच लढणाऱयांची ताकद आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने हीच एकजुटीची ताकद दाखवली आहे! महाविकास आघाडीत शिवसेनेसारखा हिंदुत्वाचा पाठीराखा पक्ष सामील झाल्याने भारतीय जनता पक्षाचा बुरखाच फाटला आहे. शिवसेनेचे विचार व शिवसेनेच्या भीतीने ते भुई थोपटत सुटले आहेत. एरवी मराठी माणसाला पाण्यात पाहणारे, मराठी माणसाच्या बाबतीत शत्रुत्वाची भूमिका घेणारे, बेळगावात मराठी माणूस हरला म्हणून महाराष्ट्रात पेढे वाटणारे हे ढोंगी आज मुंबईत ‘मराठी कट्टे’ सजवीत आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी सुरू असलेल्या या ढोंगबाजीचा मुखवटाही मराठी माणूस ओरबाडून काढल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

“शिवसेना हा एक ज्वलंत विचार आहे. सदैव उसळणारा ज्वालामुखीच आहे. शिवसेनेमुळे राजकीय विरोधकांची झोप उडाली असून त्यांना मोगलांच्या घोडय़ाप्रमाणे जळी-स्थळी शिवसेनाच दिसू लागली आहे. ही वाताहत पाहून आम्हाला या मंडळींची कींव करावीशी वाटते. विचारांचे सोने लुटा, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी शत्रुत्व करू नका असे त्यांना सांगण्याचीच सोय नाही. महाराष्ट्र हा अमृताचा कुंभ आहे. विचारांची खाण आहे. शौर्याचे तेज आहे. शमीच्या झाडावरची शस्त्र याच संपत्तीच्या रक्षणासाठी आहे. महाराष्ट्राचे मन शुद्ध आहे. आजच्या विजयादशमीला त्याच शुद्ध विचारांची सुवर्णपाने वाटूया आणि लुटूया!,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shivsena saamana editorial maharashtra cm uddhav thackeray bjp central government sgy

Next Story
‘कोरा कागद निळी शाई, आम्ही कोणाला भीत नाही’!
ताज्या बातम्या