scorecardresearch

“वरळीत त्यांना खातंही उघडता आलेलं नाही, एवढंच वाटत असेल तर…” सचिन अहिरांचं आशिष शेलारांना खुलं आव्हान!

सचिन अहिर म्हणतात, “काल ते म्हणत होते की वरळीतले आमदार आमच्या मतांनी निवडून आले आहेत. मग ते कुणाच्या मतांनी आमदार झाले? त्यांचे लोकसभेचे खासदार…!”

“वरळीत त्यांना खातंही उघडता आलेलं नाही, एवढंच वाटत असेल तर…” सचिन अहिरांचं आशिष शेलारांना खुलं आव्हान!
सचिन अहिर यांचं आशिष शेलारंना जाहीर आव्हान!

वरळी नेमकी कुणाची? यावर गेल्या काही दिवसांपासून भाजपा आणि शिवसेनेमध्ये तुफान राजकीय कलगीतुरा रंगू लागला आहे. एकीकडे आशिष शेलार यांनी वरळीच्या जांबोरी मैदानावर भाजपा जोरदार दहीहंडी साजरी करणार असल्याचा निर्धार बोलून दाखवला असताना शिवसेनेचा गड असणारी वरळी भाजपा काबीज करण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे शिवसेनेकडून या प्रकाराला जोरदार विरोध केला जात आहे. आशिष शेलार यांनी यावरून गेल्या दोन दिवसांत केलेले ट्वीट मुंबईच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरू लागले असताना आता शिवसेनेकडून सचिन अहिर यांनी आशिष शेलार यांना खुलं आव्हान दिलं आहे.

नेमका वाद काय आहे?

वरळीच्या जांबोरी मैदानावर भाजपाकडून दहीहंडी उत्सवाची तयारी सुरू असून हंडीचे थर लावून शिवसेनेच्या सत्ताकारणाचे थर कोसळवणार असल्याचा दावा भाजपाकडून केला जात आहे. आशिष शेलारांनी यासंदर्भात बुधवारी लागोपाठ ट्वीट केल्यानंतर आज सकाळी देखील ट्वीट करत शिवसेनेला खोचक टोला लगावला होता. “भाजपाच्या मतांवर निवडून यायचे आणि उगाच आमचा गड.. आमचा गड म्हणून मिरवायचे…आता बघा कसे सगळे गडगडायला लागलेय..भगव्याशी गद्दारी करणाऱ्यांचे थर कोसळायला लागलेत…लवकरच मुंबईकरच वरळीतून कोसळणाऱ्या थरांचा थरार निवडणूकीत ‘करुन दाखवतील’. आमचं ठरलंय!!” असं शेलार यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, या मुद्द्यावरून शिवसेनेकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. भाजपाकडून शिवसेनेचा गड असलेला वरळी काबीज करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचं देखील बोललं जात असताना शिवसेनेचे विधानपरिषद सदस्य सचिन अहिर यांनी विधानभवनात माध्यमांशी बोलताना जाहीर आव्हान दिलं आहे. “माझं स्पष्ट म्हणणं आहे की आशिष शेलार यांनी त्यांचे किमान ५० टक्के पदाधिकारी तरी वरळीमध्ये करावे. गेल्या वेळी ते महानगरपालिकेत स्वतंत्रपणे निवडणूक लढले होते. वरळीत त्यांना खातंही उघडता आलं नाही. त्यांना एवढंच वाटत असेल की वरळीतली हंडी ते फोडणार, तर माझं त्यांना नम्रपणे सांगणं आहे की आपला मतदारसंघ बदली करा. वरळीतून लढा. वरळीकर जनता काय असते, ते लोक तुम्हाला दाखवतील”, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.

“शेलार कुणाच्या मतांवर आमदार झाले?”

दरम्यान, भाजपाच्या मतांवर वरळीतील आमदार आदित्य ठाकरे निवडून आल्याच्या शेलारांच्या टीकेचाही सचिन अहिर यांनी समाचार घेतला. “आज मी आशिष शेलार यांचे ट्वीट पाहिले. काल ते म्हणत होते की वरळीतले आमदार आमच्या मतांनी निवडून आले आहेत. मग ते कुणाच्या मतांनी आमदार झाले? त्यांचे लोकसभेचे खासदार कुणाच्या मतांनी निवडून आले? ज्या मतदारसंघातून ते निवडून येतात, तो त्याआधी कुणाचा बालेकिल्ला होता? आमच्या जिवावर मांडीला मांडी लावून तेही निवडून आले आहेत. आता वेळ बदलली म्हणून भाषा बदलण्याचं काम काही लोक करत आहेत”, असं सचिन अहिर म्हणाले आहेत.

“आमचं ठरलंय…”, वरळी मतदारसंघाचा उल्लेख करत आशिष शेलारांचा शिवसेनेला सूचक शब्दांत टोला!

“वरळीतले थर पूर्णपणे मजबूत आहेत. शपथपत्राविषयीही त्यांनी एक ट्वीट केलं. एवढे कमी का? असं म्हटलं. पण त्यांनी याची काळजी करण्याची गरज नाही. वरळीतला शिवसैनिक निष्ठावान आहे. फक्त शपथपत्र लिहिण्यापुरता तो मर्यादित नाही. फक्त ३५०० पदाधिकारी हे शपथपत्राच्या माध्यमातून आम्ही दिले आहेत. मतदारांपर्यंत आम्ही गेलोही नाही”, असंही अहिर यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या