राजधानी दिल्लीतील जहांगीरपुरी भागात शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत झालेल्या दगडफेकीनंतर उसळलेल्या हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत १४ जणांना अटक करण्यात आली आहे. यावरुन आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात असाच प्रकार घडवण्याचे षडयंत्र होते असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

“काल दिल्लीमध्ये हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवर हल्ला करण्यात आला. आतापर्यंत रामनवमी आणि हनुमान जयंती या उत्सवादरम्यान कधीही तणावाचे वातावरण नव्हते. पण यावेळी देशातील काही शक्तींनी ठरवून हे हल्ले घडवून आणण्यासाठी फार मोठे षडयंत्र रचले. महाराष्ट्रातसुद्धा हनुमान चालिसा आणि भोंग्यांच्या निमित्ताने तणावाचे आणि दंगेसदृश्य वातावरण करण्याचे षडयंत्र रचले होते. पण महाराष्ट्राचे पोलीस आणि जनता यांनी हे वातावरण उधळून लावले आहे. यापुढे सुद्धा राज्याची जनता कोणत्याही प्रकारचे षडयंत्र कोणी रचत असेल तर ते उधळून लावेल,” असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

“रामनवमी आणि हनुमान जयंती हे शांततेणे साजरे करण्याचे दिवस आहेत. कारण या दैवतांकडून समाजाला काही प्रेरणा आणि संदेश मिळालेला आहे. पण काही लोक या दोन्ही दैवतांचा उपयोग राजकीय कारणांसाठी करत आहेत. त्यांनी हे करु नये. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या अखंडतेला आणि एकतेला धार्मिक विद्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये,” असे संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, दिल्लीतील शनिवारी जहांगीरपुरी येथे हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत झालेल्या दगडफेकीनंतर दोन समुदायांमध्ये हिंसाचार झाला, ज्यात अनेक पोलीस जखमी झाले. हिंसाचारात काही वाहनेही जाळण्यात आली. या घटनेच्या कथित व्हिडिओमध्ये अनेक लोक मिरवणुकीत दगडफेक करताना दिसत होते. त्याचवेळी काही जण रस्त्यावर तलवारी फिरवताना दिसले, तर काही जण शिवीगाळ करत असताना दिसले.

यानंतर दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी नागरिकांना सोशल मीडियावरील अफवा आणि खोट्या बातम्यांकडे लक्ष देऊ नये, दंगलखोरांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. उत्तर-पश्चिम जिल्ह्यातील घटनेनंतर परिस्थिती नियंत्रणात आहे. जहांगीरपुरी आणि इतर संवेदनशील भागात पुरेसे सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिली. गुन्हे शाखा आणि दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलसह अनेक पथके या प्रकरणाच्या तपासात गुंतलेली आहेत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी परिसरात तगडा पोलीस दल तसेच निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.