scorecardresearch

औरंगजेबाचं गुजरात कनेक्शन? संजय राऊतांचा भाजपाला टोला; म्हणाले, “म्हणून चंद्रशेखर बावनकुळेंनी…!”

संजय राऊत म्हणतात, “मागे एकदा काँग्रेसच्या नेत्याने अफझल गुरूचा उल्लेख ‘अफझल गुरूजी’ असा करताच याच भाजपाने राष्ट्रवादाच्या नावाखाली…!”

औरंगजेबाचं गुजरात कनेक्शन? संजय राऊतांचा भाजपाला टोला; म्हणाले, “म्हणून चंद्रशेखर बावनकुळेंनी…!”
औरंगजेबाचं गुजरात कनेक्शन दाखवत राऊतांचा भाजपाला टोला! (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Sanjay Raut on Aurangjeb Controversy: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानांपासून सुरू झालेला वाद आता थेट मुघल बादशाह औरंगजेबापर्यंत जाऊन पोहोचला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपावर टीका करताना ‘औरंगजेब क्रूर नव्हता’ अशा आशयाचं विधान केल्यानंतर त्यावरून मोठा वाद निर्माण झाला. या विधानाबाबत बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी औरंगजेबाचा उल्लेख ‘औरंगजेबजी’ असा करून वादाची नवी राळ उडवून दिली. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी बावनकुळेंच्या विधानाचा समाचार घेताना थेट औरंगजेबाच्या गुजरात कनेक्शनचा उल्लेख केला आहे.

“राज्यपालांनी शिवरायांचा अपमान केला. संभाजीराजांचा अपमान अजित पवारांनी केला असा भाजपचा दावा. ‘संभाजीराजे हे स्वराज्य रक्षकच, धर्मवीर नाहीत’ या पवारांच्या विधानावर आता भाजपने वाद केला; पण संभाजीराजे धर्मवीर म्हणून मान्य पावले ते औरंगजेबाने त्यांच्यावर केलेल्या निर्घृण अत्याचारामुळे. त्या औरंगजेबाचा अत्यंत आदरपूर्वक ‘‘मा. औरंगजेबजी’’ असा उल्लेख काल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. याच ‘औरंगजेबजी’ यांनी धर्मवीर संभाजीराजांना अटक केली, त्यांची धिंड काढली, त्यांना विदूषकी पोशाख घातला, त्यांची निर्घृण हत्या केली. त्यांचे डोळेही फोडले, पण संभाजीराजेंनी धर्माभिमान व स्वाभिमान सोडला नाही. हे सर्व ज्या क्रूरकर्मा औरंगजेबामुळे घडले ते ‘औरंगजेबजी’ काय साधी असामी होती? असेच भाजपच्या बावनकुळेंना म्हणायचे आहे”, असं संजय राऊतांनी सामनातील रोखठोक या सदरात नमूद केलं आहे.

“फक्त आव्हाडांच्या विधानामुळेच बावनकुळेंचं वक्तव्य नाही”

दरम्यान, औरंगजेब क्रूर नव्हता या जितेंद्र आव्हाडांच्या विधानामुळेच फक्त बावनकुळेंनी तसा उल्लेख केला नसावा, असं संजय राऊतांनी या सदरात म्हटलं आहे. “चंद्रशेखर बावनकुळे यांनी आव्हाड यांना धारेवर धरताना औरंगजेबाचा उल्लेख ‘औरंगजेबजी’ असा केला. पण मला तेच एकमेव कारण दिसत नाही. औरंगजेबास ‘माननीय’ किंवा ‘औरंगजेबजी’ ठरवण्यामागे भाजपा नेत्यांची मानसिकता अशी की, औरंगजेबजी यांचा जन्म गुजरातमधील दाहोद येथे झाला. जन्माच्या वेळी औरंगजेबाचे ‘पिताश्री’ गुजरातचे सुभेदार होते. औरंगजेबाच्या या गुजरात कनेक्शनमुळेच बावनकुळे यांनी त्याचा उल्लेख ‘औरंगजेबजी’ असा केला असावा! मागे एकदा काँग्रेसच्या नेत्याने अफझल गुरूचा उल्लेख ‘अफझल गुरूजी’ असा करताच याच भाजपाने राष्ट्रवादाच्या नावाखाली धुमाकूळ घातला होता”, अशी आठवणही संजय राऊतांनी करून दिली.

“महाराष्ट्राचे ‘पोलिटिकल कपल’ राज्यपालांशी…”, संजय राऊतांचा शिंदे-फडणवीसांवर टीकास्र, ‘त्या’ भेटीचा केला उल्लेख!

मोदींच्या भाषणाची करून दिली आठवण

दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळेंना संजय राऊतांनी मोदींच्या एका भाषणाचीही आठवण करून दिली आहे. “औरंगजेबजी यांच्याविषयी आपले पंतप्रधान मोदीजी यांनी एक जोरदार भाषण लाल किल्ल्यावरून केले. त्यास पंधरा दिवसही झाले नाहीत. त्या भाषणात मोदी यांनी औरंगजेबावर अदृश्य तलवार चालवली.बावनकुळ्यांचे ‘सन्माननीय औरंगजेबजी’ प्रकरण पंतप्रधान मोदींजी यांनाही न पटणारे आहे”, असंही संजय राऊतांनी यात नमूद केलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-01-2023 at 08:57 IST

संबंधित बातम्या