scorecardresearch

चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांच्या कामाचं कौतुक केल्यानंतर राऊतांकडून गडकरींचा उल्लेख; म्हणाले “पुतण्या मावशीचं…”

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांच्या कामाच्या पद्धतीचं कौतुक करतानाच मुख्यमंत्र्यांची कुंडली आपल्याला पहायची असल्याचं वक्तव्य केलं आहे. दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी कौतुक केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केलं आहे. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांचं कौतुक करत उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेसंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “आम्हीदेखील गडकरींचं कौतुक करत आहोत. भारतीय जनता पक्षामध्ये कौतुक करण्यासारखी माणसं आहेत. त्यांचं कौतुकही झालं पाहिजे. राजकारणापलीकडे काही विषय असतात. भाजपाच्या लोकांना अजित पवारांविषयी जे प्रेम आहे ते पुतण्या मावशीचं प्रेम आहे”.

मला उद्धव ठाकरेंची कुंडली पहायची आहे – चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या प्रश्नावर अजित पवार यांना परवा विधानसभेच्या सभागृहामध्ये चिठ्ठी लिहून हवं तर श्रेय घ्या पण संप मिटवा असं सांगितल्याचं म्हटलं. अजित पवारांची कामाची पद्धत ही रोखठोक असून होय तर होय आणि नाही तर नाही अशापद्धतीने ते काम करतात, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. यावरुनच राजू शेट्टींनी, “अजित पवार राज्य चालवतायत, मुख्यमंत्री कधीतरीच दिसतात,” अशी बारामतीमध्ये केलेल्या टीकेचा संदर्भ देत चंद्रकांत पाटलांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी या मताशी सहमती दर्शवत उद्धव ठाकरेंची कुंडली पाहण्याची इच्छा व्यक्त केली.

“वस्तूस्थिती ही आहे की आधी उद्धवजींना कोव्हीडमुळे शक्य नव्हतं, आता आजारपणामुळे शक्य नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला त्यांची कुंडली बघायची आहे. काय भाग्यवान माणूस जन्माला आलेला आहे. कशाचंच सोयसुतक नाही. पण कोणी त्यांना आडवूच शकत नाही. सगळ्यांची ती मजबुरी आहे. आता ठीक आहे एक एकाचं भाग्य असतं. पण प्रश्न तर सुटले पाहिजेत. प्रश्न एकनाथ शिंदे सोडवू शकतात, अजित पवार सोडवू शकतात. लोक त्यांच्याकडे जातात,” असा टोला चंद्रकांत पाटलांनी लागवला आहे.

यशवंत जाधवांच्या डायरीत ‘मातोश्री’ला दोन कोटी रोख आणि ५० लाखांचं घड्याळ दिल्याची नोंद; राऊत म्हणाले “ही पंरपरा…”

दरम्यान स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधवांच्या यांच्या काही मालमत्ता प्राप्तिकर विभागाकडून जप्त करण्यात आल्या असून त्यांची चौकशी सुरू आहे. त्यांच्या डायरीत ‘मातोश्री’ला दोन कोटी रुपये आणि ५० लाख रुपयांचे घडय़ाळ दिल्याची नोंद असल्याची माहिती प्राप्तिकर विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. दरम्यान हा उल्लेख आपल्या आईबाबतचा असल्याचा खुलासा यशवंत जाधव यांनी प्राप्तिकर विभागाकडे केला आहे. यावरही संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.

“मातोश्रीला म्हणजे आईला असू शकत नाही का? महाराष्ट्रात दान, धर्म करण्याची परंपरा आहे. त्यांनी आईला दान धर्मासाठी काही पैसे दिले असतील. शिवसेनेत डायरी लिहिण्याची परंपरा नाही. ऐकून आम्हाला गंमत वाटली,” असं संजय राऊत म्हणाले.

“देशाच्या राजकारणातील दोन किंवा तीन डायऱ्या आम्हाला माहिती आहेत. या डायरींमध्ये गुजरातपासून ते इतरांपर्यंत कोट्यावधी कोणाला मिळाले याच्या नोंदी होत्या. त्याची सीबीआय चौकशी झाली होती. तेव्हा सीबीआयने अशा डायऱ्या विश्वास ठेवण्यायोग्य नसतात असं सागितलं होतं. भाजपा नेत्यांची नावं त्यात होती, सुप्रीम कोर्टातही हे टिकलं नव्हतं. मग आमच्या लोकांचा उल्लेख करुन डायरीबद्दल का सांगितलं जात आहे?,” अशी विचारणा संजय राऊत यांनी केली आहे.

“डायरी हा पुरावा असू शकत नाही. खोट्या डायऱ्या तयार केल्या जाऊ शकतात. जर भाजपाच्या प्रेरणेने तपास यंत्रणा खोटे पुरावे, गुन्हे, खटले तयार करत असतील तर कशावरुन खोट्या डायऱ्या केल्या नाहीत. महाराष्ट्रात सध्या ज्या प्रकारचं राजकारण सुरु आहे, धमक्या दिल्या जात आहेत की महाग पडेल म्हणजेच खोट्या डायऱ्या तयार करु,” असा आरोप संजय राऊतांनी केला.

“माझा भाजपाच्या कार्यपद्धतीवरच संशय आहे. ते काहीही खोटं तयर करु शकतात. बनावटं माणंस, कागदं काहीही करु शकतात. कोणत्याही थराला जाऊ शकतात,” अशी टीका संजय राऊतांनी केली. “बिर्ला, सारडा, जैन या डायऱ्यावंर त्यांनी आधी बोलाव. ते कोट्यावधी कोणी पचवले, डायऱ्या कोणी गिळल्या यावर आधी बोलावं,” असंही ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shivsena sanjay raut bjp chandrakant patil maharashtra cm uddhav thackeray ajit pawar sgy

ताज्या बातम्या