महाराष्ट्रात ज्याप्रकारे तीन पक्षांनी जनमताची चोरी केली, ती आम्ही गोव्यात होऊ देणार नाही असं राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच शिवसेनेने आपलं डिपॉझिट जप्त होऊ नये याकडे लक्ष द्यावं असा टोलाही त्यांनी लगावला आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांच्या टीकेला उत्तर दिलं असून शिवसेना भाजपाच्या नोटांना पुरून उरेल असा विश्वास व्यक्त केला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रमधून तिकडे गेले आहेत, ते गेल्यावर भाजपा तिथे फुटला. काल एक मंत्री मायकल लोबो यांनी पक्षाचा त्याग केला. भाजपाचे आमदारही पक्ष सोडून गेले. तेव्हा त्यांनी आधी पक्षांतर्गत युद्ध सुरू आहे ते बघावे,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

दरम्यान फडणवीसांनी नोटासंबंधी केलेल्या टीकेबाबत विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “गोव्यात आमची खरी लढाई नोटांशीच आहे. भाजपाचे लोक गोव्यात नोटांचा पाऊस पाडत आहेत, विशेषत: महाराष्ट्रातून बॅगा जात आहेत. त्यामुळे शिवसेनेसारखा पक्ष गोव्यात त्या नोटांशी नक्की लढेल आणि जनतेला दबावाखाली येऊ नका असं सांगण्याचा प्रयत्न करेल. शिवसेना हा सर्वसामान्यांचा, बहुजनांना, हिंदुत्ववादी पक्ष आहे. शिवसेना भाजपाच्या नोटांना पुरून उरेल हे नक्की आहे. फडणवीसांना माझा शब्द आहे तुम्ही कितीही नोटा टाका आम्ही नोटांशी लढू”.

“महाराष्ट्रात ज्या प्रकारे तीन पक्षांनी जनमताची चोरी केली, ती आम्ही गोव्यात होऊ देणार नाही”

दरम्यान उत्तर प्रदेशात भाजपामधून काही नेते बाहेर पडल्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “भाजपामध्ये लागलेली गळती ही सुरुवात आहे. ओपिनियन पोलनुसार भाजपा पुन्हा एकदा सत्तेवर येईल असं सांगितलं जात आहे, आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. सत्तेत येणाऱ्या पक्षांना कधी गळती लागत नाही. मंत्री, आमदार, प्रमुख कार्यकर्ते पक्ष सोडत नाहीत. त्यामुळे उत्तर प्रदेशचा प्रवास हा राजकीय परिवर्तनाच्या दिशेने सुरू आहे याची खात्री आहे”.

मुख्यमंत्री कधी घराबाहेर पडतील? आणि शरद पवार पंतप्रधान कधी होतील? याबद्दल संजय राऊत यांनी सांगावं म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांनाही त्यांनी उत्तर दिलं. “त्यांना योग्य वेळी माहिती देऊ. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम उत्तम सुरू आहे. येत्या १३ तारखेला पंतप्रधानांसोबत होणाऱ्या बैठकीत ते सहभागी होतील. शरद पवार यांच्याइतकी राजकारणाची, समाजकारणाची आणि व्यक्तिमत्वाची उंची आधी गाठा. तुमच्यासारखी जी टेकाडं आहेत त्यांना सह्याद्री किंवा हिमालयाच्या उंचीशी स्पर्धा करता येणार नाही. पंतप्रधान पदावर एखादा माणूस बसला म्हणून तो मोठा होत नाही. पंडित नेहरु, इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री यांची उंची मोठीच होती. अनेकदा अनेक व्यक्ती त्या पदावर पोहोचू शकल्या नाहीत तरी त्यांची उंची कमी होत नाही,” अशा शब्दांत संजय राऊतांनी सुनावलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena sanjay raut bjp devendra fadanvis goa election sgy
First published on: 12-01-2022 at 10:47 IST