गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ होताना दिसत आहे. शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० शिवसेना आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यातलं सरकार अल्पमतात आल्याचं चित्र निर्माण झालं आहे. मात्र, आघाडी सरकारमधील नेते सरकार अल्पमतात नसल्याचे दावे करत आहेत. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यामध्ये दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना खुलं आव्हान दिलं आहे. आज सकाळी माध्यमांशी बोलताना राऊतांनी एकनाथ शिंदे गटावर टीका करताना हे आव्हान दिलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावाल, त्यांचे भक्त आहोत असं म्हणाल. पण बाळासाहेबांचे भक्त अशा प्रकारे पाठित खंजीर नाही खुपसणार. जे व्हायचंय ते होऊ द्या. जे करायचंय ते करा. मुंबईत तर यावं लागले ना? तिथे बसून आम्हाला सल्ला-मार्गदर्शन करत आहेत. लाखो शिवसैनिक जमिनीवर आहेत. आमच्या एका इशाऱ्याची वाट पाहात आहेत. पण आम्ही अजूनही संयम ठेवला आहे. त्यामुळे कोण शक्तीप्रदर्शन करत आहेत, कोण काय करतंय त्यानं काही फरक पडत नाही”, असं राऊत म्हणाले.

“बंडखोरांमध्ये देखील बंडखोरी होऊ शकते”

“ते जेव्हा इथे येतील तेव्हा कळेल नक्की बंडखोरी कुठे होणार आहे. अस्वस्थता हा शब्द खूप सौम्य आहे. बंडखोरांमध्ये देखील बंडखोरी होऊ शकते”, अशा सूचक शब्दांत राऊतांनी इशारा दिला आहे.

“शिंदेंचे मुख्यमंत्रीपद भाजपाने शब्द फिरवल्यामुळेच हुकले”; रोखठोकमधून संजय राऊतांची बंडखोर आमदारांवर टीका

“खाण्यात अफू, चरस, गांजा घेतात का?”

दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेची गळचेपी झाल्याच्या बंडखोर आमदारांच्या आरोपांवर संजय राऊतांनी पलटवार केला. “वेडे आहेत ते लोक. कोणत्या नशेत आहेत ते माहिती नाही. त्यांना खाण्यात अफू, चरस, गांजा देतात काय कुणास ठाऊक. अडीच वर्षांपासून सत्तेत आहेत. सगळे मंत्री बनून बसले आहेत. मलईदार खाती घेऊन बसले आहेत. आता अचानक त्यांना साक्षात्कार झालाय का?”, असा सवाल राऊतांनी केला.

‘आना ही पडेगा, चौपाटी में’; नरहरी झिरवाळांचा फोटो ट्वीट करत संजय राऊतांचा बंडखोरांना खोचक टोला

“मी नारायण राणेंना मानतो, त्यांचा…”

“जे फुटले त्यांची शिवसेना असू शकत नाही. तुमच्यात धमक आहे तर आमदारकीचे राजीनामे द्या. मी नारायण राणेंना मानतो. त्यांचा गट लहान होता. पण त्यांनी राजीनामे दिले. ते निवडणुकीला सामोरे गेले. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदेंचे २२ लोक फुटले. राजीनामा दिला. निवडणुकीला सामोरे गेले, जिंकून आले. त्यांनी सरकार बनवलं. तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही राजीनामे द्यायचे. कितीही असू द्या. ५४ असू द्या. राजीनामे द्यायचे आणि आपापल्या मतदारसंघात जाऊन निवडणुका लढवण्याची हिंमत दाखवा. हे माझं खुलं आव्हान आहे. तुम्ही गुवाहाटीत बसून आम्हाला शिवसेनेची, हिंदुत्वाची अक्कल शिकवणार”, अशा शब्दांत राऊतांनी बंडखोर आमदारांच्या गटाला आव्हान दिलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena sanjay raut challenge to eknath shinde group on election pmw
First published on: 26-06-2022 at 10:31 IST