“नवाब मलिक हे एका चिडीतून सगळं करतायत हे…”, संजय राऊतांनी मांडलं स्पष्ट मत

“राज्याची आर्थिक परिस्थिती समजून घेतली पाहिजे. ते न करता रोज सकाळी आरोप प्रत्यारोप होत आहेत”

Shivsena, Sanjay Raut, Congress, Nana Patole, NCP, Nawab Malik, BJP, Devendra Fadanvis, NCB, Sameer Wankhede
"राज्याची आर्थिक परिस्थिती समजून घेतली पाहिजे. ते न करता रोज सकाळी आरोप प्रत्यारोप होत आहेत"

राज्याची आर्थिक परिस्थिती समजून घेतली पाहिजे. ते न करता रोज सकाळी आरोप प्रत्यारोप होत आहेत. कुठेतरी याला मर्यादा घातली पाहिजे असं स्पष्ट मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मांडलं आहे. “नवाब मलिक हे एका चिडीतून सगळं करतायत हे मला माहिती आहे. त्यांच्या कुटुंबावर जो प्रसंद आणि संकट आलं होतं ते आम्ही जवळून पाहिल आहे. त्यामुळे कोणीतरी प्रमुख व्यक्तीने पुढाकार घेऊन मार्ग काढला पाहिजे. प्रमुख व्यक्ती मुख्यमंत्री किंवा शरद पवार आहेत. ज्यांना महाराष्ट्राच्या हिताची आणि प्रतिष्ठेची चिंता आहे,” असंही संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं आहे.

“हे आरोप-प्रत्यारोपाच राजकारण थांबले पाहिजे. या आरोपांच्या चिखलफेकीत मोठ्यांनी लक्ष देणं गरेजचं आहे. नवाब मलिकांचे आरोप संतापातून होत आहेत. काल मी राज्यपालांना भेटलो त्यांनी देखील यावर चिंता व्यक्त केली”, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

भाजपाच्या वॉशिंग मशिनमध्ये गेला की एकदम चकचकीत होतात

संजय राऊत म्हणाले, “कुणी कोणता फोटो दाखवला तर तो सबंध असल्याचा पुरावा होऊ शकत नाही. रियाज भाटीचे फोटो नरेंद्र मोदी यांच्यासोबत देखील आहेत. भाजपाकडे जी वॉशिंग मशीन आहे त्यामध्ये घातले की सगळे स्वच्छ होतात. ती मशीन भाजपाने तयार केली आहे. गुंड, दाऊद, शकीलचे लोक आमच्याकडे असले तर याचा माणूस त्याचा माणूस…मात्र भाजपाच्या वॉशिंग मशिनमध्ये गेला की एकदम चकचकीत शुभ्र होतो. सध्याच्या राजकारणात कोणीही कोणाकडे बोट दाखवू नये. महाराष्ट्रात रोज चिखलफेक सुरू आहे यांना कंटाळा कसा येत नाही. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि इतर प्रश्नाकडे पाहायला हवं”.

नाना पटोलेंनीही व्यक्त केली चिंता

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील आरोप-प्रत्यारोपांवरुन चिंता व्यक्त केली आहे. “दहशतवाद्यांशी संबंध आहेत असे आरोप कालपासून सुरु झाले आहेत. जे आरोप करत आहेत त्यांना सिद्ध करावं लागेल. कारण या आरोप-प्रत्यारोपांमुळे महाराष्ट्राची मोठी बदनामी होत आहे. यामुळे दोन्ही बाजूंना पुरावे सादर करावे लागतील, कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे दहशतवाद्यांसोबत, बनावट नोटां छापणाऱ्यांसोबत संबंध आहेत असा आरोप झाला आहे. राज्याचे मंत्रीही दहशतवाद्यांशी संबंधित असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे. हे सिद्ध करावं लागले. पण काँग्रेससाठी जनतेचे मुद्दे महत्त्वाचे आहेत,” असं नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shivsena sanjay raut congress nana patole ncp nawab malik bjp devendra fadanvis ncb sameer wankhede sgy

Next Story
‘बुद्धिस्ट सर्किट’ विकासातून पर्यटनास चालना
ताज्या बातम्या