शिवसेना खासदार संजय राऊत आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यातील भेट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. संजय राऊत यांनी मंगळवारी राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर आता ते प्रियंका गांधी यांची भेट घेणार आहे. प्रियंका गांधी यांना भेटायला काहीच हरकत नाही, त्या काँग्रेसच्या महासचिव आहेत. त्यांनी भेटण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा आधी उद्धव ठाकरे आणि आदित्य यांच्याशी चर्चा केली अशी माहिती संजय राऊत यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. तसंच युपीएसंदर्भात उद्धव ठाकरे योग्यवेळी भूमिका मांडतील असं संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“राहुल गांधी आणि आमची नेहमी भेट होत असते. महाराष्ट्रातील घडामोडींसंबंधी ते नेहमी माझ्याकडून माहिती घेत असतात. प्रियंका गांधी यांच्याशी पहिल्यांदाच राजकीय भेट होत आहे. भेटायला काहीच हरकत नाही, त्या काँग्रेसच्या महासचिव आहेत. त्यांनी भेटण्यासंबंधी इच्छा व्यक्त केल्यानंतर मी आधी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार आज मी त्यांना भेटत आहे,” अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

महाराष्ट्रामध्ये सुरु असलेला प्रयोग मिनी यूपीएचाच- संजय राऊत

“मी शिवसैनिक असून हे सूचनेनुसार आणि आदेशानुसारच करत असतो. ज्या घडामोडींमध्ये आम्ही सहभागी होत असतो त्याची माहिती पक्षप्रमुखांना देत असतो,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

युपीएत सामील होण्यासंबंधी उद्धव ठाकरेंच्या भूमिकेबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “उद्धव ठाकरे योग्य वेळी आपलं म्हणणं मांडतील, त्यात लपवण्यासारखं काही नाही. आम्ही महाराष्ट्रात काँग्रेससोबत सरकार चालवत आहोत. आमच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि लहान घटक सहभागी आहेत. ही महाविकास आघाडी म्हणजे महाराष्ट्रातील मिनी युपीए आहे. देशातील हा एक ऐतिहासिक क्रांतीकारक आणि साहसी प्रयोग महाराष्ट्रात यशस्वीपणे सुरु असल्याचं सर्वांनाच कौतुक आहे. आघाडीची कामाची पद्धत, वेग यावर राहुल गांधींनीही समाधान व्यक्त केलं आहे”.

विरोधकांच्या एकीसाठी राहुल यांनी पुढाकार घ्यावा!

“शरद पवारांना या भेटींविषयी काही शंका नाहीत. काल संध्याकाळी शरद पवारांशीही माझी चर्चा झाली. राहुल गांधींना भेटण्याआधीही त्यांच्याशी चर्चा केली. कारण आम्ही एकत्र असून एकमेकांच्या मनात आहोत. म्हणूनच राज्यातील सरकार सुरळीत सुरु आहे,” असं यावेळी त्यांनी सांगितलं.

उत्तर प्रदेशात शिवसेना आणि काँग्रेस एकत्र लढण्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “हा पुढचा विषय आहे. प्रियंका गांधी काँग्रेस पक्षाच्या एक महत्वाच्या नेत्या आहेत. निर्णय प्रक्रियेत त्या सहभागी असतात. गांधी कुटुंबातील महत्वाच्या घटक असून त्यां ना एखाद्या विषयावर चर्चा करायची असेल तर ती करणं आमचं कर्तव्य आहे”.

“युपीए मजबूत झाली पाहिजे हे सर्वांचं मत आहे. उद्धव ठाकरे यांनीदेखील एक मोठी आघाडी उभी राहिली पाहिजे असं सांगितलं आहे. आपण जेव्हा मोठी लढाई लढतो तेव्हा गट. वेगळ्या आघाड्या असे विषय येता कामा नये,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

“शरद पवारांच्या उंचीचा नेता नाही”

संजय राऊत यांनी राहुल गांधी भेटीत विरोधकांना एकत्र आणण्यासाठी राहुल यांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन केलं. काँग्रेसशिवाय विरोधकांची आघाडी अशक्य असल्याचा पुनरूच्चार राऊत यांनी या भेटीनंतर बोलताना केला होता. दरम्यान पत्रकारांनी राहुल गांधी आणि शरद पवारांचा उल्लेख करत यासंबंधी प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, “राहुल गांधींनी पुढाकार घेतला याचा अर्थ शरद पवारांनी घेऊ नये असा होत नाही. शरद पवारांच्या उंचीचा नेता आज राजकारणात नाही. आजही देशातील सर्व प्रमुख, राजकीय पक्षांचे नेते हे शरद पवारांना आदर, मान देतात ते आम्हा सर्वांसाठी महत्वाचा आहे. राहुल गांधींच्या चर्चेतही हा विषय आला होता,” अशी माहिती संजय राऊतांनी दिली.

“महाराष्ट्रात कोणी कोणाला खांद्यावर खेळवलं हे सर्वांना माहिती”

चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना संजय राऊत यांनी यावेळी, “इतकं गंभीरपणे घेण्याचं कारण नाही. ही वक्तव्यं नैराश्यातून, वैफल्यातून येत असतात, त्यामुळे त्यांना गंभीरतने घेण्याची गरज नाही. उत्तर ऐकून त्यांना त्रास होईल. त्यांची प्रकृती नीट राहावी म्हणून मी उत्तर देत नाही. महाराष्ट्रात कोण कोणाला खांद्यावर घेऊन वाढवत होतं हे संपूर्ण देशाला माहिती आहे. माझ्या उत्तराने अनेकांची प्रकृती ढासळेल, म्हणून मी उत्तर देत नाही. महाराष्ट्राच्या जनतेचं आरोग्य आणि खासकरुन विरोधकांचं आरोग्य चांगलं राहावं अशी माझी अपेक्षा आहे,” असं उत्तर दिलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena sanjay raut congress rahul gandhi priyanka gandhi ncp sharad pawar sgy
First published on: 08-12-2021 at 10:05 IST