पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर निवडून आलेले काही लोक दररोज सकाळी ब्रशही न करता त्यांना शिव्या घालू लागले आहेत. पण, त्याने काहीही फरक पडत नाही. राजकारणात पाठीत खंजीर खुपसणे हा शब्द उच्चारताच पूर्वी एक चेहरा समोर यायचा. आता त्या जागी दुसरा येऊ लागला आहे, अशा शब्दात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख न करता त्यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आम्ही पाठीत खंजीर खुपसत नाही, तर कोथळा बाहेर काढतो असं म्हटले होते. आता त्यावरुन नवा वाद सुरु झाला आहे.

पुण्यामध्ये भाजपातर्फे या वक्तव्यावरुन तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे माध्यमांनी सांगितले असता संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केलं आहे. “मी असं काय केलं आहे की तक्रार दाखल करावी. कोणाचा कोथळा बाहेर काढू असं म्हटलंय? ते पाठीत खंजीर खुपसत होते. पाठीत खंजीर खुपसण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही. आपण समोरून वार करतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी समोरून वार केले आहेत. त्यांना आम्ही शिवचरित्र पाठवू. त्यातल्या एखाद्या शिवचरित्रामधील इतिहासामध्ये कोथळा काढणं म्हणजे नक्की काय याचा त्यांनी अभ्यास केला तर त्याची आम्ही चर्चा करु. आम्ही इतिहास समजून घेतो आणि तो घडवण्याचा प्रयत्न करतो. इतिहास चिवडत बसत नाही,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

हेही वाचा >> पाठीत खंजीर खुपसणारे ‘हे’ दुसरे..!

याआधी चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत संजय राऊत यांच्या वक्तव्यावर टीका केली होती. “कोथळा काढायला हातात जे शस्त्र घ्यायला लागते ते पेलवण्यासाठी विश्वासघातक्यांच्या दंडात ताकद आहे का? आता भाजपा प्रामाणिक मित्रपक्षांसोबतच येणाऱ्या सर्व निवडणूका लढेल आणि जिंकेल!” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते.

कोथळा, खंजीर आणि संजय राऊत…, शिवसेना-भाजपा संघर्ष सुरूच; चंद्रकांत पाटील म्हणाले,..

“मी पाठीत खंजीर खुपसला अस सांगितलं आणि ते त्यांना झोंबले. त्यावर संजय राऊत असं म्हटले की आम्ही पाठीत खंजीर खुपसत नाही, तर कोथळा बाहेर काढतो. यावर मी उद्धव ठाकरे यांना आवाहन केलं आहे आणि कार्यकर्त्यांनाही आवाहन करतो की, यावर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार द्या. जर राणे यांच्या एक थोबाडीत मारली असती. या वाक्यावर त्यांची अटक होते. मग संजय राऊत यांचं वाक्य तर खूप भयंकर असून उद्धव ठाकरे यांनी अ‍ॅक्शन घेतली पाहिजे,” असेही चंद्रकांत पाटील म्हणाले होते.