scorecardresearch

“मनोहर पर्रिकरांनी ज्यांना मोठं केलं तेच त्यांच्या मुलाची औकात काढत आहेत”; संजय राऊत संतापले

“आजही गोव्यात भाजपा पर्रिकरांच्या नावाने ओळखली जाते आणि त्यांच्याच मुलाची औकात काढली जात आहे”

Shivsena, Sanjay Raut, Former Goa CM Manohar Parrikar, Utpal Parrikar, Goa Assembly Election,
"आजही गोव्यात भाजपा त्यांच्या नावाने ओळखली जाते आणि त्यांच्याच मुलाची औकात काढली जात आहे"

गोवा विधानसभा निवडणुकीत सध्या गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांची चांगलीच चर्चा रंगली आहे. उत्पल पर्रिकर यांना तिकीट देण्यावरुन सध्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहे. उत्पल पर्रिकर यांनी तर विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पणजीतून तिकीट न दिल्यास कठीण निर्णय घ्यावा लागेल, असा इशाराही दिला आहे. दरम्यान दुसरीकडे शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत उत्पल पर्रिकर यांना सतत पाठिंबा दर्शवत असून पुन्हा एकदा भाजपावर टीका केली आहे.

मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “मनोहर पर्रिकरांचा मुलगा इकडे तिकडे फिरत असून त्याला अपमानित केलं जात आहे. त्याची औकात काढली जात आहे. मग तिकीट देण्याची चर्चा कधीपासून सुरु झाली. उत्पल पर्रिकर अपक्ष उभे राहिल्यास आम्ही सर्व त्यांना पाठिंबा देऊ असं आम्ही सांगितल्यानंतर भाजपाची धावपळ सुरु झाली आहे. त्यांना तिकीट द्यावंच लागेल”.

“संजय राऊतांचे तिथे ऐकायला कोण बसलं आहे? ”; उत्पल पर्रीकरांना पाठिंबा देण्यावरुन चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

“मी कोणतंही राजकीय भाष्य करत नाही. पण मनोहर पर्रीकर गोव्यातील प्रमुख नेते होते. गोव्याच्या विकासात त्यांचं योगदान आहे. आज गोव्यात जी भाजपा दिसत आहे त्यात मनोहर पर्रिकर यांचंच योगदान आहे. आजही गोव्यात भाजपा त्यांच्या नावाने ओळखली जाते आणि त्यांच्याच मुलाची औकात काढली जात आहे. गोव्यात, राजकारणात पर्रिकरांनी ज्यांना मोठं केलं तेच त्यांच्या मुलाची औकात काढत आहेत हे चांगलं वाटलं नाही,” असंही संजय राऊत यावेळी म्हणाले.

“कोणत्याच पक्षाने उत्पल पर्रिकरांविरोधात उमेदवार देऊ नये;” संजय राऊतांचं राजकीय पक्षांना आवाहन

“त्यांना तिकीट देणं, न देणं ही पुढील गोष्ट आहे. पण उत्पल पर्रिकर यांच्या जागी माफियाला तिकीट दिलं जात आहे. उत्पल पर्रिकर यांचं ट्वीट मी पाहिलं आहे. तिथे कोणाला तिकीट देत आहात त्यावर चर्चा करा, त्यानंतर पाहू,” असंही संजय राऊतांनी सांगितलं.

“भाजपाने उत्पल पर्रिकरांना तिकीट देण्यासाठी इतका वेळ का लावला आहे? ते कोण सांगणार. जे बोलत आहेत त्यांच्या हातात असतं तर त्यांनी कधीच तिकीटासंबंधी निर्णय घेतला असता. हे फक्त बोलघेवडे आहेत. उत्पल पर्रिकरांचं तिकीट का थांबवलं आहे हा मोठा प्रश्न आहे. त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत बाबीत पडण्याचं कारण नाही. जर उत्पल पर्रिकर अपक्ष उभे राहणार असतील तर मनोहर पर्रीकरांना आदरांजली म्हणून सर्व राजकीय पक्षांनी विरोधात उमेदवार देऊ नये इतकंच आमचं म्हणणं आहे,” असं संजय राऊतांनी यावेळी स्पष्ट केलं.

“महाराष्ट्रातही अनेकदा असं घडतं. एखाद्या नेत्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाविषयी सहानुभूती असते. एखादी व्यक्ती निवडणुकीला उभं राहिल्यास आपण लढणार नाही म्हणून सांगतो. गोव्यात ही परंपरा नसली तरी मी मांडलेल्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे,” असंही त्यांनी सांगितलं.

“उद्या गोव्यात जात असून उमेदवारांची यादी घोषित करू. राष्ट्रवादीदेखील त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर करेल. आम्ही उद्या लढण्यासंबंधी चर्चा करु,” अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. “गोवा लहान राज्य आहे. प्रत्येकजण आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत असून कोणलाही बहुमत मिळणार नाही. गोव्यात वेगळीच खिचडी शिजत आहे,” असं संजय राऊत म्हणाले.

भाजपा खासदार रवी किसन यांनी दलिताच्या घरी जेवण करण्यासंबंधी बोलताना हे सर्व ढोंग असल्याचं मी आधीच म्हटलं असल्याचं सांगितलं. “जातीचं राजकारण, मतांसाठी ते ढोंग करत आहेत. हे सत्य नसून सर्व घाण आणि ढोंग आहे,” असं त्यांनी सांगितलं.

अखिलेश यादव यांनी ममता बॅनर्जी यांनी उत्तर प्रदेश निवडणुकीत व्हर्च्यूअल रॅली घ्यावी असं म्हटलं आहे. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी म्हटलं की, “उत्तर प्रदेश मधील वातावरण बदलायचं असेल तर त्यांनी व्हर्च्यूअल रॅली केली आणि त्यातून अखिलेश यादव यांना फायदा होत असेल तर त्यांनी व्हर्चुअल रॅली करायला पाहिजे. संजय राऊत यांनी यावेळी नाना पटोलेंच्या वक्तव्यावर बोलणं टाळलं. मला माहिती नाही सांगत त्यांनी बोलण्यास नकार दिला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shivsena sanjay raut former goa cm manohar parrikar son utpal parrikar ticket goa assembly election sgy

ताज्या बातम्या