विधानपरिषदेतील १२ सदस्यांच्या नियुक्तीवरुन शिवसेना खासदार संजय राऊत आक्रमक झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळा अभ्यास करुन २४ तासात बालकोटवर सर्जिकल स्ट्राइक केला होता. आता कुठलं एवढं १२ आमदारांवर संशोधन सुरु आहे अशी विचारणा त्यांनी केली आहे. कोणाला पीएचडी करायची असेल तर तीदेखील करुन घ्या असा टोलाही त्यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना लगावला आहे.

“१२ आमदारांचं सदस्यत्व रोखून ठेवणं हा घटनेचा भंग आहे. राज्यपालांनी कोणत्या कालमर्यादेत सदस्य नेमले पाहिजेत असं कायद्यात कुठेही सांगितलेलं नाही असं जर कोणी वकील सांगत असेल तर त्यांना कायदा माहिती नाही. याचा अर्थ असाही नाही की विधान परिषदेत १२ सदस्यांना नेमायचंच नाही. हे राजकारण असून महाराष्ट्राच्या जनतेवर अन्याय आहे. लोकशाहीचा अवमान आहे,” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

“राजभवनातून फाईलीचा शोध लागत नसल्याचं सांगण्यात आलं आहे, ही तर भयंकर आणि गंभीर समस्या आहे. तिथे कोणतं वादळ आलं आणि त्यात ती गायब झाली? का तिथे भुतप्रेत आलं आणि घेऊन गेली,” अशी उपहासात्मक विचारणा संजय राऊत यांनी केली आहे.

“अशाप्रकारे घटनाबाह्य काम करणं महत्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तीला शोभत नाही. जर १२ सदस्यांना नेमलं असतं तर आज करोना संकटात महाराष्ट्र अजून जोमाने काम करत असता. मुख्यमंत्र्यांना मदत मिळाली असतील. पण राजकारण असल्याने १२ सदस्यांची नियुक्ती थांबवण्यात आली आहे. आता तर हायकोर्टाने फाईल कुठे आहे विचारलं आहे. त्यांना उत्तर द्यावं लागेल,” असंही ते म्हणाले आहेत.

“मुख्यमंत्री हे जनतेच्या अपेक्षेला खरे उतरतील, पण या मुंबईला लुटण्याचं काम दिल्लीवाले सातत्याने करत असतात. त्यांची काही जबाबदारी आहे की नाही? पंतप्रधान गुजरातला जातात आणि एका झटक्यात एक हजार कोटी रुपये देतात. बाजूला जुळं भावंड महाराष्ट्र आहे, पण महाराष्ट्राला काही नाही. म्हणजे येथील लोकांना तडफडून मरायचं का? तुम्हाला मजा वाटतीये? हे एक प्रकारचं निर्घृणं कुत्य आहे,” असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

“केंद्र आणि राज्यात संघर्ष होता कामा नये पण न मागता गुजरातला एक हजार कोटींची मदत दिली जाते. पण महाराष्ट्राचा आक्रोश, आकांत, वेदना समजत नाही. वारंवार आम्हाला हात पसरावे लागत असून महाराष्ट्राची जनता पाहत आहे,” असंही संजय राऊत बोलले आहेत. “रामदेवबाबा यांनी केलेलं वक्तव्य विरोधी पक्षातील नेत्याने केलं असतं तर भाजपाने रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं असतं,” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

नाना पटोलेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया
“काँग्रेसशिवाय सरकार आहे अशी शंका नाना पटोले यांना का यावी. हे सरकार बनवताना आम्ही आघाडीवर होतो. राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांच्याशी सुरुवातीपासूनच आमच्या चर्चा सुरु होत्या. शरद पवार, उद्धव किंवा अन्य नेते असतील…त्यामुळे हे सरकार एकमेकांच्या मदतीनं, सहकार्यानेच चाललं आहे. याचं विस्मरण तिन्ही पक्षातील कोणालाही झालेलं नाही,” असं यावेळी त्यांनी सांगितलं.