दुकानांवरील मराठी पाटय़ा लावताना शोधल्या जाणाऱ्या पळवाटा रोखत मराठी पाटय़ा सक्तीचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. दरम्यान महाराष्ट्रात दुकानांवरील मराठी पाटय़ांचे श्रेय इतर कोणी लाटू नये. ते श्रेय फक्त मनसेचे व मनसे कार्यकर्त्यांचे अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडली आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मराठी पाटय़ांवरून शिवसेना आणि मनसेत श्रेयवादाचे राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत. दरम्यान राज ठाकरे यांनी आता कच खाऊ नका. याची अंमलबजावणी नीट करा असा सल्ला राज्य सरकारला दिला आहे. त्यांच्या या सल्ल्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“हे श्रेय फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं”

महाराष्ट्रात दुकानांवर मराठीत पाटय़ा असाव्यात यासाठी खरे तर आंदोलन करण्याची गरजच पडू नये. पण २००८ आणि २००९ मध्ये दुकानांवरील पाटय़ा मराठीतच हव्यात यासाठी मनसेने आंदोलन केले. महाराष्ट्राला जागे केले. मनसैनिकांनी खटले अंगावर घेतले आणि शिक्षाही भोगल्या. दुकानांच्या पाटय़ावर सर्वात ठळकपणे नाव मराठीत असले पाहिजे असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्याबद्दल सरकारचे अभिनंदन. पण त्यामुळे हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा कुणीही करू नये असे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नमूद केले आहे.

मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांना मनसेचा इशारा; म्हणाले, “दुकानाच्या काचा बदलण्याचा…”

“सरकारने मराठी पाटय़ा सक्तीच्या निर्णयाची कठोर अंमलबजावणी करावी. तसेच इतर भाषेतही नाव चालेल ही सवलत देऊ नये. केवळ मराठीतच पाटी असावी. मराठीची लिपी ही देवनागरी असून ती सर्वाना कळते. महाराष्ट्रात फक्त मराठीच चालणार याची पुन्हा आठवण करून द्यायला लावू नका,” असेही ठाकरे यांनी बजावलं आहे.

संजय राऊतांचं उत्तर –

दरम्यान राज ठाकरेंचं वक्तव्य आणि सल्ल्यासंबंधी विचारण्यात आलं असता संजय राऊत म्हणाले की, “कोणी काय सल्ला दिला यावर शिवसेना आपलं धोरण ठरवत नाही. बाळासाहेबांनी जेव्हा शिवसेना स्थापन केली तेव्हापासून आंदोलन सुरु आहे. आमची स्थानिय लोकाधिकार समिती, अन्य संघटना आजही या प्रकारचं काम करतात. अनेक पक्ष आमच्या पक्षातून बाहेर गेले आहेत, पण जाताना तोच विचार घेऊन बाहेर गेले आहेत. कोण काय बोलतं यावर महाविकास आघाडी किंवा शिवसेनेचं धोरण ठरत नाही”.

सर्व दुकानांना मराठीत नामफलक बंधनकारक ; अन्य भाषांनाही मुभा, पण अक्षरांचा आकार मराठीपेक्षा मोठा नको..

“मराठी हा शिवसेनेचा आत्मा आहे. मराठी अस्मिता राहणार, त्याच्याशी कधी तडजोड करणार नाही,” असं यावेळी संजय राऊतांनी सांगितलं.

मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्यांना इशारा –

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मराठी पाट्यांचा खर्च सरकारने द्यावा अशी मागणी केली आहे. यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “ते आम्ही पाहू. महाराष्ट्रात राहत आहात, येथील मातीचं खात आहात, श्वास घेत आहात याचे ऋण फेडण्याची वेळ असताना तुम्ही महाराष्ट्रासंदर्भात अशी वक्तव्यं करणं याला बेईमानी म्हणतात. मग तो खासदार, व्यापारी किंवा कोणीही असो”.

“शिवसेनेचा जन्मच अस्मितेच्या मुद्द्यावर झाला आहे. अशा प्रकारची भाषा दक्षिणेत जाऊन करा,” असं आव्हानदेखील यावेळी त्यांनी दिलं.

मोदींसोबतच्या बैठकीतील मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवर भाष्य –

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना स्थितीचा आढावा घेत मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थित राहिले होते. यासंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी त्याच्यावर मुख्यमंत्री सचिवालय खुलासा करेल असं सांगितलं. “मुख्यमंत्री नाही हजर राहिले, कधी काळी पंतप्रधानही एखाद्या बैठकीला हजर राहणार नाहीत. ज्यांच्याकडे सगळी सूत्रं आहेत ते आरोग्यमंत्री होते. त्यांना कमी का लेखत आहात?,” अशी विचारणा यावेळी संजय राऊतांनी केली.

मात्र यावरुन भाजपा टीका करत आहेत यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “भाजपाच्या आय़ुष्यात टीका करण्याशिवाय दुसरं काय आहे. खरं तर भाजपाने चीनने केलेल्या घुसखोरीवर बोललं पाहिजे. तिथे सीमेवर फार गंभीर स्थिती आहे. भारत-पाकिस्तानवर रोज बोलत आहे, पण आता भारत-चीनवर बोला आणि टीका करा”.

चंद्रकांत पाटलांच्या टीकेवर बोलताना ते म्हणाले की, “या संपूर्ण देशात कोणतं राज्य नीट असेल तर ते महाराष्ट्र आहे. चंद्रकांत पाटील किवं भाजपाच्या अनेक नेत्यांच्या चष्म्याचा नंबर चेक करावा लागेल. नेत्रतज्ञ डॉक्टर लहानेंचं एखादं पथक भाजपाच्या कार्यालयात पाठवता येईल का हे पाहतो. त्यांना श्रवणयंत्रपण देणार आहे. शिवसेना असे मेडिकल कॅम्प घेत असतं. जर कोणाला गरज असेल तर त्यांच्यावर उपचार करु. महाराष्ट्रातील राज्य उत्तम प्रकारे सुरु आहे”.

“मुंबै बँकेच्या अध्यक्षपदीही महाविकास आघाडीचं नेतृत्व आलं आहे. हळूहळू या सगळ्या संस्था, संघटना यावर महाविकास आघाडीचा कब्जा असेल. चंद्रकांत पाटील हे फार सज्जन, निरागस, निष्पाप, निष्कपट आहेत. त्यांनी पुढील निवडणुकीची तयारी करावी. उगाच इकडे तिकडे न तडमडता प्रतिमेला जपावं,” असा सल्ला यावेळी संजय राऊतांनी दिला.

“राकेश टिकैत मोठे नेते”

संजय राऊत यांनी गुरुवारी शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेतली. या भेटीसंबंधी बोलताना ते म्हणाले की, “राकेश टिकैत मोठे नेते आहेत. प्रदीर्घ काळानंतर लढाऊ संपवून ते घऱी गेले होते. योद्ध्याला घऱी जाऊन भेटायचं असतं. उद्धव ठाकरेंच्या सूचनेनुसार भेट घेत त्यांच्याशी चर्चा करुन देश आणि उत्तर प्रदेशच्या राजकारणाविषयी मत समजून घेतलं. त्यांनी काही सूचना केल्या आहेत. त्यांना राजकारणात ओढण्याचा प्रश्न येत नाही. त्यांची संघटना राजकारणात जाणार नाही. त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळावेत. उद्धव ठाकरेंनी फोवनरुन त्यांच्याशी चर्चा केली. ही लढाई संपली नसून सुरु ठेवा असं त्यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्रात येण्यासाठी आमंत्रणही दिलं आहे”. शिवसेना उत्तर प्रदेशात ५० जागा लढणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.

गोव्यात प्रफुल्ल पटेल यांनी स्वतंत्रपणे लढू असं सांगितलं आहे. त्यांच्याशी चर्चा करणार आहे. आम्ही दोघे एकत्र आहोत. मला उद्या गोव्यात तृणमूल काँग्रेसचे काही नेते भेटणार आहेत अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena sanjay raut mns raj thackeray marathi name boards maharashtra government sgy
First published on: 14-01-2022 at 09:50 IST